मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना मुख्यमंत्री भेटले

सर्वसामान्य, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी

मुंबई,२७ जानेवारी / प्रतिनिधी :- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि श्री. जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. श्री. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी श्री. जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि श्री. जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल श्री. जरांगे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

यावेळी सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मी आपल्या प्रेमापोटी ह्याठिकाणी आलो आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने गरीब मराठा समाजाच्या दु:खाची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजासाठी लढणारे कै. अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम होत आहे त्यांनाही मी अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नव्हे तर सर्व समाज घटकांच्या हितासाठी घेतले आहेत.

सकल मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत व्यक्त करतानाच कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश केला आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली. मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अन्य समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवून त्यांचे  आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन काल अधिसूचना काढली त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

राज्य सरकारकडून मागण्या मान्य होताच मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे यासोबतच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनातून केली होती.हे आंदोलन आंतरवाली सराटी येथून सुरू करण्यात आले होते. सरकारकडे यासाठी वेळही मागण्यात आली होती. दोनदा वेळ वाढवून दिल्यावरही सरकारने कोणतेचे पाऊल उचलले नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वाशीत येऊन धडकले होते.राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध संपला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या आहे. आम्ही सरकारच्या पत्राचा स्वीकार करेन. 

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जरांगेच्या मागणीनुसार कोणा-कोणाला मिळणार कुणबी आरक्षण

राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये ‘सगेसोयरे’या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे.ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्यागणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

सरकारने जारी केलेल्या जीआमध्ये सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. जीआर नुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगेसोयरे असतील. तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये (GR) करण्यात आला आहे.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील नातेवाईक, असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

तसेच कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.