बीड हिंसाचार प्रकरण: पाच मुख्य आरोपींसह २५४ जणांना पोलिसांकडून अटक

बीड,२३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बीडमध्ये हिंसाचार झाला. यावेळी संतापलेल्या जमावकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यात दहा टोळ्यांचा समावेश असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून पोलिसांनी याप्रकरणी २५४ जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

पोलिसांकडून बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २०० हून अधक लोकांची चौकसी करण्यात आली आहे.यामध्ये २५४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे १७ अल्पवयीन मुलांचा देखील यात समावेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विषेश म्हणजे याप्रकरणी अटक केलेल्या एकाही आरोपीलाअद्याप जामीन मिळालेला नाही. यातील १३ आरोपींनी बीडच्या न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाकडून त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसंच अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे बीड जिल्ह्यातील असून एकही आरोपी हा बीड बाहेरचा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा देखील आधार घेतला आहे. तसंच अटक केलेल्या लोकांच्या जवाबावरुन आणखी ३०० लोकांची ओळख पटली आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना बीडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या या हिंसाचारात आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर याचं पेटवून देण्यात आलं. सोबतच माजलगाव सगरपरिषदेच्या इमरातीला देखील आग लावण्यात आली. तसंच बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसेसची देखील तोडफोड करण्यात आली होती.

या जमावकडून बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं,राजकीय पक्षांची कार्यालय देखील सुटली नाहीत. त्यामुळे हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आरोपींकडून केली जाणार भरपाई

बीड आणि माजलगाव शहरात झालेल्या हिंसाचारात सुमारे ११ कोटी रुपयांचं नुकसान झालं. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपींकडून केली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल देखील तयार होत आहे. आरोपींनी भरपाई देण्यास नकार दिला तर त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करुन वसुली केली जाणार असल्याचं पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.