लिव्ह इनमध्ये राहणा-या मुलीला संपवण्यासाठी बापाने रचला कट

मराठा आरक्षणाचा फायदा घेत मुलीलाच लिहायला लावली सुसाईड नोट…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असताना तरुणांच्या आत्महत्येच्या घटना सुरुच आहेत. त्यामुळे हा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. याचाच फायदा घेत बापाने आपल्या मुलीला मारण्याचा कट रचल्याची एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीला घरी आणून, तिच्याकडून वडिलांनी ‘आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची’ सुसाईड नोट लिहून घेतली. यानंतर वडील आपल्याला मारुन टाकतील असा या मुलीला संशय आला आणि तिने आपल्या मित्राला मेसेज करुन कळवले. मित्राने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने होणारा प्रसंग टळला आणि मुलीची सुटका झाली. या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी काय घटना घडली?

छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या या मुलीचं शाळेत असतानाच प्रीतज घोळवे नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण जुळलं. कायद्याने सज्ञान झाल्यानंतर या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तो मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हता. तरीही ते दोघं भाड्याच्या घरात एकत्र लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याचवेळी मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार वाळुंज पोलीस ठाण्यात दिली. मात्र मुलीने आपल्याला आईवडिलांकडे राहायचे नसून प्रीतजसोबतच राहायचे आहे, असा जबाब दिला.

मुलीने घरी येण्यास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांनी पुन्हा ५ नोव्हेंबर रोजी तिचं घर गाठलं. तसेच तिच्या मित्राला मारहाण करून मुलीला पुन्हा आपल्या घरी आणलं. तिचा मोबाईल देखील स्वतःजवळ ठेवून घेतला. या दरम्यान काही दिवसांनी वडिलांनी तिच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. ज्यात, ‘आरक्षण नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत असून शिकू शकत नाही आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असून, कोणालाही जबाबदार धरू नये.’ असा मजकूर लिहून घेतला. सोबतच या चिठ्ठीवर मुलीचा अंगठा देखील घेतला. त्यामुळे वडील आपली हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव करतील असा संशय मुलीला आला आणि ती प्रचंड घाबरली.

वडिलांनी तिचा फोन काढून घेतल्यामुळे तिला कोणाशीच संपर्कही साधता येत नव्हता. दरम्यान, तिने नजर चुकवून एका नातेवाईकाचा फोन घेतला आणि त्यावरुन प्रीतजला ‘हे मारून टाकतील रे मला, लवकर ये’ असा मेसेज पाठवला. सोबतच ‘तो दिसला तर त्याला तिथेच संपवा आणि हिलापण’, असंही घरचे सतत बोलत असल्याचे तिने प्रीतजला कळवले.

मेसेज मिळताच प्रीतजने ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील घटनेची गंभीरपणे दखल घेत तात्काळ मुलीचे घर गाठले. तसेच, मुलीसह तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात नेले. तिथेही मुलगी प्रीतजसोबत राहण्यावर ठाम होती. त्यानंतर प्रीतजच्या तक्रारीवरून मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.