अल्पवयीन पत्नीवर वारंवार बळजबरी बलात्‍कार करणाऱ्या पतीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि ४५ हजार रुपयांचा दंड

अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या आई-वडिलांना एक वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यानंतर, मारहाण करुन तिच्‍यावर वारंवार बळजबरी बलात्‍कार करणाऱ्या नराधम पतीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ४५ हजार रुपयांचा दंड तर पोटच्‍या अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या आई-वडिलांना एक वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी मंगळवारी दि.२६ ठोठावली. विशेष म्हणजे खटल्याच्‍या सुनावणीवेळी गुन्‍हा दाखल करणारी पीडिता ही स्‍वत: फितुर झाली होती. बापु यशवंतराव जगताप (२८, रा. नांदरा ता. सिल्लोड) असे आरोपी पतीचे नाव  आहे.

या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, मार्च २०१९ मध्‍ये पीडितेची दहावीच्‍या परिक्षा संपल्यानंतर पीडितेचे आई-वडील पीडितेला चिंचोली (ता. सिल्लोड) गावात जत्रा पाहण्‍यासाठी घेवून गेले होते. त्‍यावेळी गणेशपुर (ता. सिल्लोड) येथे राहणाऱ्या पीडितेच्‍या आजीकडे थांबले. दुस ऱ्यादिवशी पीडितेसह तिचे आई-वडील आणि आजी जत्रा पाहण्‍यासाठी गेले होते. ७ एप्रिल २०१९ रोजी सर्व गणेशपुरला असताना पीडितेला पाहण्‍यासाठी आरोपी बापू जगताप आला. तेव्‍हा आपले आई-वडील लग्न लावून देणार असल्याचे पीडितेला समजले. तिने मला १८ वर्षे पूर्ण  झालेले नाही, मला आणखी शिकायचे आहे, मला लग्न करायचे नाही असे आई-वडिलांना सांगितले. त्‍यानंतरही पीडितेच्‍या आई-वडिलांनी ७ एप्रिल २०१९ रोजी पीडितेची सुपारी फोडली. १९ एप्रिल २०१९ रोजी पीडितेच्‍या लग्नाची तारीख निश्चित  आली, त्‍यावेळी पीडितेने आरोपी बापू याला माझे वय कमी असून मला आणखी शिकायचे आहे, असे सांगितले, मात्र त्‍याने पीडितेचे ऐकले नाही. २५ एप्रिल २०१९ रोजी जबरदस्‍ती पीडितेचे लग्न आरोपी बापू  जगताप याच्‍याशी लावण्‍यात आले. लग्नानंतर आरोपी बापू  जगताप याने दारु प्राशन करुन पीडितेला मारहाण केली. त्‍यानंतर तिच्‍यावर वारंवार बळजबरी बलात्‍कार केला. या प्रकरणात सातपुर (जि. नाशिक) पोलिस ठाण्‍यात उपनिरीक्षक नरोटे यांनी गुन्‍हा दाखल केल्यानंतर तो सिल्लोड पोलिस ठाण्‍याकडे वर्ग करण्‍यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी उपनिरीक्षक आडे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्‍वरी नागुला (डोली) यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे गुन्‍हा दाखल करणारी पीडिताच फितुर झाली.

दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी  बापू  जगताप याला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ (२) अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम ४ (२) अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम ६ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम ८ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, बाल विवाह कायद्याच्‍या कलम ९ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तर पीडितेच्‍या आई-वडिलांना बाल विवाह कायद्याच्‍या कलम १० अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.