अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करणाऱ्या प्रियकराला बेड्या,विनयभंग करणाऱ्या मावसकाकांवर गुन्‍हा

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :-प्रेमाच्‍या अनाभाक घेत अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करणाऱ्या प्रियकराला मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी दि.२५ रात्री बेड्या ठोकल्या. जयेश नंदु बागुल (२३, रा. विठ्ठलनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी मंगळवारी दि.२६ दिले.तर अल्पवयीन पीडितेवर बलात्‍कार करणाऱ्या मावसभावासह तिच्‍यावर बळजबरी करण्‍याचा प्रयत्‍नकरुन तिचा विनयभंग करणाऱ्या मावसकाकांवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

प्रकरणात १७ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १८ जुलै रोजी पीडिता ही क्लासेससाठी गेली ती परतलीच नसल्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपास सुरु असताना २५ जुलै रोजी पीडिता पोलिस ठाण्‍यात हजर झाली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. त्‍यानूसार, पीडिता ही आई-वडिलांसह आजीकडे (पीडितेच्‍या आईच्‍या आईकडे) राहते. आजी मागील आठ वर्षांपासून अर्धांगवायुग्रस्‍त आहे, त्‍यामुळे तिची देखभाल करण्‍यासाठी पीडितेच्‍या दोन मावशा या कुटूंबासह नेहमी राहण्‍यासाठी येत असतात. तर एक मावशी घराच्‍या शेजारीच राहते. पीडितेची आई हे एका शाळेवर शिक्षिका  आहे तर वडिलांना फीट येत असल्याने ते घरीच राहतात. दरम्यान पीडिता २०१८ मध्‍ये इयत्ता ९ वीत असताना तिची आरोपी जयेश बागुल याच्‍याशी ओळख झाली. त्‍यांच्‍या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ही बाब पीडितेच्‍या घरच्‍यांना माहिती झाल्यावर त्‍यांनी जयेशशी कुठलेही संबंध ठेवण्‍यास पीडितेला मनाई केली.

२०१८ मध्‍ये पीडितेची गणेश नगरात रहाणरी मावशी कुटूंबासह पीडितेच्‍या आजीच्‍या घरी आले. त्‍यावेळी मावस काकाने पीडितेच्‍या गुप्‍त अंगाना स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. एप्रिल २०१९ मध्‍ये पीडिता ही आरोपी जयेश याला भेटण्‍यासाठी त्‍याच्‍या घरी गेली होती, त्‍यावेळी त्‍याने पीडितेवर बलात्‍कार केला. ७ मार्च रोजी हिंदुस्‍तान आवास (इटखेडा) येथे राहणारी मावशी ही कुटूंबासह पीडितेच्‍या आजीच्‍या घरी राहण्‍यासाठी आली. ८ मार्च रोजी रात्री पीडिता झोपलेली असताना मावसकाकाने पीडितेशी लगट करण्‍याचा प्रयत्‍न केला. मे २०२२ मध्‍ये पीडिता ही बहिण व घराशेजारी राहणाऱ्या मावसभावांसह गच्‍चीवर झोपले होते. त्‍यावेळी मावसभावाने पीडितेशी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. १४ जून रोजी शेजारी राहणाऱ्या मावसभावाने पीडितेला जलजिरा पिण्‍यासाठी दिला, तेव्‍हा पीडितेला चक्कर आली. त्‍यानंतर मावसभावाने तिच्‍यावर बलात्‍कार केला. या सर्व घटनांमुळे पीडिताही मानसिकरित्‍या खचली होती.

१८ जुलै रोजी पीडिता घरातून निघुन गेली. १९ जुलै रोजी ती रेल्वेने कल्याणला गेली. तेथे जयेश बागुल तिला घेण्‍यासाठी आला, त्‍यानंतर ते दोघे बदलापुर (जि. ठाणे) येथे त्‍याच्‍या काकाकडे घेवून गेला. २२ जुलै रोजी त्‍याने पीडितेवर बलात्‍कार केला. मुकुंदवाडी पोलिस तिचा शोध घेत असताना जयेशच्‍या काकुने तिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात आणले.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे हस्‍तगत करायचे आहेत. आरोपीची वैद्यकिय तपासणी करायची आहे. गुन्‍ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे. गुन्‍हा संवेदनशील असल्याने गुन्‍ह्याचा सखोल तपास करयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.