औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणाहून 100 ब्रास वाळू जप्त

महसूल, पोलिस आणि मनपा विभागाची संयुक्त कारवाई,वाहतूक पासेसची होणार तपासणी

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद शहरातील आझाद चौक, एन दोन, पुंडलिक नगर, परिसर, एन आठ राष्ट्रवादी भवन परिसर आदी ठिकाणी जवळपास अंदाजे 100 ब्रास अवैधरित्या साठवून ठेवलेली वाळू महसूल, पोलिस आणि मनपाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आली आहे. सदरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून संबंधितांना वाहतूक पास असल्याशिवाय वाळूचा साठा जमा करू नये, अन्यथा नियमानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले आहे.

शहरातील विविध ठिकाणात साठवून ठेवलेले वाळूंचे साठे पथकाने तपासले. यामध्ये साठवणूक केलेल्या वाळूंची वाहतूक पास तपासण्यात आली. काही वाहतूक पासेस गौण खनिज विभागाच्या जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलेल्या आहेत. पंचनाम्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यक्तींविरोधात महसूल अधिनियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या कारवाईमध्ये मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या साहित्य सामुग्रीद्वारे जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आली आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

वाहतूक पास बाळगण्याचे आवाहनशहरातील विविध भागात सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे वाळू वाहतूक पास सोबत बाळगावेत, मागणी केल्यास पथकाला पास दाखवावेत, ज्यांच्याकडे वाहतूक पास नसतील त्यांच्यावर महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.