ठाण्यातील मनोज जरांगे-पाटील यांची सभा म्हणजे माझ्या विरोधातील  नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

कोल्हापूर  ,२१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे-पाटील हे राज्यभर फिरुन सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते ठाणे-पालघर च्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात मनोज जरांगे-पाटील हे सभा घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ठाण्यातील सभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील हे सध्या सगळीकडे सभा घेत आहेत. त्यामध्ये कसलीही अडचण नाही. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटत आहेत. ठाण्यातील त्यांची सभा म्हणजे माझ्या विरोधातील सभा नाही. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. सर्वांशी संवाद साधताय.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार यासाठी कटीबद्द आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसींचं आरक्षण कमी न करता, कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्धी पातळीवर काम सुरु आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती यावर काम करत आहे. कायमस्वरुपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार आहे. त्यावर आमचं युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असं शिंदे म्हणाले. ते कोल्हापूर येते पत्रकारांशी बोलत होते.