आपला कुठलाच देव बॅचलर नाही; चंद्रकांत पाटीलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

पुणे,१३ जानेवारी / प्रतिनिधी :-भाजप नेते चंद्रकांत पाटील अनेकदा महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविरोधात आंदोलने झाली, महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. यानंतरही पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की, “आपला कोणताच देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही” असे वक्तव्य केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आपला कुठलाही देव बॅचलर नाही, आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करूनही सगळं करता येते. हिंदू हा फक्त धर्म नाही, तर एक विचार आहे. हिंदू राजाने कुठल्याही धर्मावर आक्रमण केलेले नाही. आपला सनातन धर्म ५ हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दाचा अर्थच सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा देव एकच हा विचार मांडलेला आहे.”

पुढे ते म्हणाले की, “जगात असा कुठलाही मनुष्य नाही, ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही, तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. सगळी माणसे त्याने बनवली आहेत. इंग्रज भारतात आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायला लागलो.”