‘ते काही माझे शत्रू नाहीत’; फडणवीसांचे ठाकरे पिता-पुत्रांबद्दल मोठे विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे नाव उद्देशून शत्रू नसल्याचे केले विधान

मुंबई ,२३ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-महाविकास आघाडी सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा टीकाटिप्पणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. असे असताना नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले की, “उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. आमच्यामध्ये फक्त वैचारिक मतभेद आहे. ते वेगळ्या विचारासोबत गेले आणि मी वेगळ्या विचाराचा आहे.” त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याआधी आदित्य ठाकरे म्हणले होते की, “आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय मानतात?” असे विधान केले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील संस्कृतीनुसार आम्ही फक्त वैचारिक विरोधक आहोत. अलीकडच्या काळामध्ये आमच्यामध्ये थोडे शत्रुत्व पाहण्यास मिळत आहे, पण ते योग्य नसून कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. आम्ही वैचारिक विरोधक असलो तरीही आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही,” गेले काही दिवस, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मग ते पहाटेच्या शपथविधीचा असो किंवा २०१९मध्ये उद्धव ठाकरेंची काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी असो. पण, त्यांनी केलेल्या या नव्या विधानामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.