आधी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवून दाखवा; भाजपचे आव्हान

मुंबई ,१८ मार्च  /प्रतिनिधी :- ‘मी राज्यात त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले होते. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

Image

“शरद पवार यांनी भाजपची काळजी करू नये. आधी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असे आव्हानच भाजपने दिले आहे. महाविकास आघाडीतील तरुण आमदारांनी शरद पवार यांची भेटली. यावेळी शरद पवारांनी तरुण आमदारांना महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल. तसेच तुम्ही मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रीत करा, असे सांगत त्यांना आश्वस्त केले.

ट्विटमध्ये भाजपने म्हंटले आहे की, “आधी राष्ट्रवादीचे ६० आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!” असे म्हणत टोला लगावला.


 पुढे भाजपने ट्विट करत म्हंटले की, “आदरणीय शरदजी पवार, राज्यात एसटी बंद असून, ६ महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपून जात आहेत. तसेच, मराठा ओबीसी आरक्षणाचा मोठा प्रश्न राज्यात आहे. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा, मग भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी करा.” असे म्हणत टीका केली.

तर पुढच्या ट्विटमध्ये म्हंटले की, “कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल!” असे म्हणत शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपने समाचार घेतला आहे.