“फडणवीस नाहीत तर कोण?”, मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई,२१ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक दिवस सुरूच आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आता राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. कल्याणमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला ते आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते ते समोर आले, त्यावर जरांगे यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं की, ‘देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत. तर, तो मधला माणूस कोण आहे हे आता शोधलं पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर शोधून काढावं, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही यावेळी सांगितलं.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नाही. हे आता समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा दुसरा व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं होतं. त्या आधीही मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं होतं. पण आज ते परत एकदा बोलताना म्हणाले की, माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नाही. स्क्रिप्ट वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे.