कोकण किनारपट्टीसह प. महाराष्ट्र, मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

आला रे आला! मान्सून अंदमानात धडकला

मुंबई,१६ मे /प्रतिनिधी :- अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल झाले आहे. १६ ते १९ मे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर १५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सात राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेले असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण

हवामानतज्ञांच्या मते, पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात विषुववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपावणारे दमदार पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी वेगाने पुढील पाच दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाले असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मान्सून अंदमानात धडकला

अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहेत. तर केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मान्सूनचा पाऊस रविवारी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून हवामान विभागाने केरळ, तामिळनाडू, माहे आणि लक्षद्वीप परिसराला देखील पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

सध्या अरबी समुद्रातून दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारताच्या दिशेने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळसह कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप परिसरात अचानक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.