आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा खडाजंगी

दोन्ही गटांच्या वकिलांमधील युक्तिवाद शिगेला…

मुंबई : ठाकरे गट विरुद्ध शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी पार पडली. यादरम्यान, ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादादरम्यान पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही वकिलांनी केलेल्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असा सल्ला देत अध्यक्षांनी आपली नाराजी दर्शवली.

शिवसेना शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत उपस्थित होते. कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला २४ तारखेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी हा वेळ वाढवून मागितला. तर ठाकरे गटाने आज कागदपत्रे सादर केली.

ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे.

सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितले. या सुनावणीत आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.