चेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

प्राप्तिकर विभागाने आयटी सेझ विकासक, आयटी सेझचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार प्रकरणात 27/11/2020 रोजी छापे टाकले . चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी  शोध मोहीम राबवण्यात आली.

I-T raid at eight locations in Chennai; Rs 90 cr, 100 kgs gold seized |  Business Standard News

माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या  3 वर्षात सुमारे  100 कोटी रुपयांची  बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे.  एका  निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम सुरु असल्याचे 160 कोटी रुपयांचे खोटे दावे सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे.  या कंपनीने  सल्लागारांचे बनावट शुल्क म्हणून सुमारे  30 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा आणि  20 कोटी रुपयांच्या अस्वीकारार्ह व्याज शुल्काचाही   दावा केला होता.

या धाडीमध्ये आयटी सेझ विकासकाशी संबंधित काही समभाग  खरेदी व्यवहार उघडकीला आले. या संस्थेच्या समभागांची विक्री त्याच्या पूर्वीचे भागधारक, रहिवासी आणि अनिवासी संस्था यांनी केली होती, ज्यानी  2017-18 आर्थिक वर्षात मॉरीशस इथल्या मध्यस्थाद्वारे  2300 कोटी रुपयांची  गुंतवणूक केली होती मात्र या विक्री व्यवहारातून झालेला भांडवली नफा प्राप्तिकर विभागाकडे  जाहीर करण्यात आला नाही.

दोन्ही भागधारकांकडील अघोषित भांडवली नफा निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे. रोख रकमेसह अन्य जमीन व्यवहार आणि अनिवार्य परिवर्तनीय रोख्यांशी संबंधित प्रकरणांचीही तपासणी केली जात आहे

स्टेनलेस-स्टील पुरवठादाराकडे  सापडलेल्या पुराव्यांवरून असे आढळून आले आहे की पुरवठादार गट  हिशेबी ,  बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी असे विक्रीचे तीन व्यवहार करत आहे.  बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी विक्रीचे प्रमाण दरवर्षी  एकूण विक्रीच्या 25% पेक्षा जास्त होते . तसेच त्यांनी  विविध ग्राहकांना सेल्स अकोमोडेशन बिले दिली आहेत आणि या व्यवहारांवर 10% पेक्षा जास्त कमिशन प्राप्त केले आहे. सध्या बेहिशेबी उत्पन्नाचे मूल्यांकन केले जात असून ते अंदाजे 100 कोटी रुपये आहे. वित्तपुरवठा, सावकारी कर्ज आणि गृहनिर्माण  विकासामध्ये हा गट सहभागी आहे.  या कंपनीने  केलेले  बेहिशेबी व्यवहार आणि तेथील  बेहिशेबी भांडवल / कर्जाचा ओघ  सुमारे  50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

आतापर्यंतच्या धाडीत 450  कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी  उत्पन्न सापडले आहे.पुढील तपास सुरू आहे.