भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली,६ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत कधीच नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिले.कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही. महाविकासआघाडी उत्तम काम करत असून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. 5 वर्ष पूर्ण करुन महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देखील पवारांनी व्यक्त केला.

लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटे चर्चा सुरू होती. दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण या चर्चेचा तपशील काय होता? याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पवार म्हणाले, लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडला. विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्यावर कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

संजय राऊत ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

राज्यपालांकडे दोन वर्षापूर्वी 12 आमदारांकडे महाराष्ट्र सरकारने यादी दिली. पण त्यावर राज्यपालांनी सही केली नाही. संजय राऊत राज्यसभा सदस्य आहेत. त्यांची अर्धा एकर अलिबाग मध्ये जागा आहे. ती जप्त केली. यांवर चर्चा केली. संजय राऊत यांच्यावरील कारवाईची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल. संजय राऊत प्रकरणात उद्धव ठाकरेंशी बोललो नाहीये. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करेन. असं ही पवार म्हणाले.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंबंधी यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

पक्षपाती कारवाया पाहून पवारांना अस्वस्थ वाटलं असेल, मोदी भेटीनंतर राऊतांकडून पवारांचे आभार

No photo description available.

संध्याकाळी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे आभार मानले आहेत, तसेच या कारवाईवरून त्यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

पवारांची राजकीय उंची मोठी

मविआ नेत्यांवर दबावासाठी कारवाई सुरू आहे, त्याबाबत पवारांनी याकडे मोदींचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे. आता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने हे मोदींना सांगणं म्हणजे देशात ज्या ठिकाणी भाजपची सरकारं नाहीत. त्या सर्व विरोधी पक्षांचे हे प्रतिनिधीत्व आहे. शरद पवारांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत काम केलं आहे. त्यांच्या विचारांची उंची वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी मोदींवर समोर विचार मांडले, हे अत्यंत महत्वाचे आहे, असेही राऊत म्हणाले. याने काही फरक पडू नाही तर न पडू, आम्ही कशालाही घाबरणार नाही, असेही राऊत म्हणाले. तसेच त्यांनी आयएनएस विक्रांच्या मुद्द्यावरून अनेक आरोप केले आहे.

शरद पवार मोदींना का भेटले याची जास्त माहिती माझ्याकडे, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत. तसेच माझ्यासरख्या माणसाला संसदेत बोलू देत नाहीत. बोलल्यावर आम्ही कारवाईला सामोरे जातोय, मात्र आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. आम्ही लढणारी लोकं आहोत. पवारांनी पन्नास वर्षे राजकारण पाहिलं आहे. त्यांना या कारवाई बघून अस्वस्थ वाटले असेल त्यामुळे पवारांचं मोदींशी बोलनं सर्वांसाठी महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली, तसेच मला माझ्या पक्षातील सर्वांचा पाठिंबा आहे, उद्धव ठाकरे सतत माझ्या संपर्कात आहेत. प्रियंका गांधी यांचाही मला फोन आला होता. अनेक नेत्यांचा मला पाठिंबा मिळतोय, तसेच आमच्यात घाबरण्यास मनाई आहे आणि मी लढणारा माणूस आहे, असेही राऊत म्हणाले.