औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई,६ एप्रिल  /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम गतीने करून हा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संजय शिरसाट, प्रधान सचिव संजीव जयस्वाल,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटींची योजना मंजूर आहे. औरंगाबाद शहरासाठी हा पाणीपुरवठा प्रकल्प महत्वपूर्ण असून सर्व संबंधीत यंत्रणांनी या प्रकल्पाचे काम गतीने करून प्रकल्प त्वरित पूर्ण करावा. योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पाइपलाईनचे काम गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. संबंधित यंत्रणांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास आपल्या स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ते सुव्यवस्थितपणे वितरीत करावे. संबंधित ठेकेदारांनी प्रकल्पाचे काम कालबद्ध रीतीने  पूर्ण करावे. अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील यांनी दिले.

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरात नागरी सुविधांची अनेक दर्जेदार कामे झाली आहेत. शहरासाठी आवश्यक असणाऱ्या या पाणीपुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा देण्यात यावा. शहरातील पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या निवृत्त तज्ज्ञ अधिका-यांचेही सहकार्य घेण्यात यावे. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.