सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे रुग्णालयातून दिले निमंत्रण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस

मुंबई ,१३ एप्रिल /प्रतिनिधी :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज ता. (१३) बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आराम करण्याचा सल्ला दिला. अजितदादा

पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही दूरध्वनी वरून धनंजय मुंडे यांची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री महोदयांनी रुग्णाल्यामध्ये जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करुन मुंडेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुंडे यांची भेट घेऊन आराम करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान धनंजय मुंडे यांना आज दिवसभरात खा. सुप्रियाताई सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, क्रीडा मंत्री संजय केदार, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. किरण सरनाईक, आ. आशिष शेलार, आ. बाळासाहेब आजबे, आ. विक्रम काळे, आ. संजय दौंड, आ. निरंजन डावखरे, सलील देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, श्री. बिपीन श्रीमाळी यांसह अनेकांनी भेटून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात मंगळवारी रात्रीपासून उपचार सुरु आहेत. सततच्या प्रवास व दगदगीमुळे मुंडेंची प्रकृती बिघडली, त्यांच्या प्रकृतीबाबत काळजीचे कारण नाही, मात्र डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी दिली.

उद्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची धनंजय मुंडेंना काळजी

दि. 14 एप्रिल (गुरुवार) रोजी सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागाने भव्य कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी रुग्णालयात चर्चा करताना, धनंजय मुंडे यांनी गुरुवारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली; दिवसभरात भेटायला आलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंडे सूचना देत होते. ‘धनंजय तू आधी बरा हो, आम्ही सर्वजण मिळून कार्यक्रम व्यवस्थित व यशस्वीपणे पूर्ण करतो’ असा स्नेहाचा सल्लाही अजितदादांनी धनंजय मुंडेंना दिला.

चाहत्यांची पूजा पाठ आणि मुंडेंचे आवाहन

दरम्यान धनंजय मुंडे हे अचानक आजारी पडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळासह मुंडेंच्या चाहत्यांमध्येही प्रचंड अस्वस्थता पसरली. अनेकांनी आपल्या इष्ट देवतांना साकडे घालणे, पूजा घालणे, पायी चालत जाणे आदी करत धनंजय मुंडे बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या तर अनेकांनी रात्रीतून मुंबई गाठली.

धनंजय मुंडे यांना सक्त विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे मुंबईत भेटीसाठी न येता मुंडेंना आराम पडल्यास यथावकाश ते सर्वांना भेटतील. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपल्या शरीराला त्रास किंवा इजा होईल किंवा उपवास घडतील असे कोणतेही कृत्य समर्थकांनी करू नये, ते ना. मुंडे यांनाही आवडणारे नाही; कडक उन्हाळ्याच्या दिवसात आपणही काळजी घ्यावी तसेच गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.