गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 49 टक्के वाढ-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

नवी दिल्ली, – चालू वर्षीच्या (2021-22 ) रब्बी विपणन हंगामात केंद्र सरकारकडून  आतापर्यंत (6 मे 2021 ) 323.67 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गहू खरेदीत 49 टक्के वाढ झाली आहे , अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.  

May be an image of 1 person and standing

     केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की,  सध्याच्या रब्बी विपणन हंगामात आतापर्यंत 32 लाख 21 हजार शेतकऱ्यांचा गहू किमान आधारभूत किंमतीने विकत घेण्यात आला असून त्यापोटी शेतकऱ्यांना 63 हजार 924.56 कोटी रु.  देण्यात आले आहेत.  गेल्या वर्षी याच कालावधीत 216.01 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली होती. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंडीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि बिहार या राज्यात गहू खरेदी चालू आहे.   

     तसेच 6 मे 2021 पर्यंत नोडल संस्थांच्या माध्यमातून सरकारने किमान आधारभूत मूल्याने 6,41,251.32 मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, मसूर, भुईमुग, मोहरी आणि सोयाबीन खरेदी केले आहे. यातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील 3 लाख 98 हजार 877 शेतकऱ्यांना खरीप 2020-21 आणि रब्बी 2021 च्या हंगामात फायदा झाला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांकडून विक्रमी अन्न धान्य खरेदी होईल यासाठी आम्ही  अथक प्रयत्न करत आहोत. शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काम करत राहणं या साठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.