गरीबांचे कल्याण हा या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्वाचा पैलू -पंतप्रधान नरेंद्र मोदी

अर्थसंकल्पात अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि आणखी रोजगार यासाठी संधी

शेतीक्षेत्राला आकर्षक आणि नव्या संधींनी युक्त करणे हो या अर्थसंकल्पातील तरतूदींचे लक्ष्य

अर्थसंकल्पाने विकासाचा नवा विश्वास जागवला 

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शतकातून एकदाच येणाऱ्या नैसर्गीक संकटकाळातही या वर्षीचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेउन आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला समर्थ बनवेल व सामान्यांसाठी नव्या संधींचेही निर्माण करेल.  असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की आधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि आणखी रोजगार यासाठी सर्व संधींनी युक्त असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प हरित-रोजगार निर्माण करेल. फक्त सध्याचे प्रश्न सोडवण्यासोबतच युवावर्गाच्या उज्वल भविष्याची हमी हा अर्थसंकल्प देतो असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी ड्रोन, वंदेभारत रेल्वेगाडी, डिजिटल चलन, 5G सेवा, राष्ट्रीय डिजिटल आरोग्यसेवा याद्वारे प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची कास आणि तंत्रज्ञान यामुळे आपल्या युवावर्गाला, मध्यमवर्गाला, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांसाठी अगदी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प, असे वर्णन पंतप्रधानांनी केले आहे.

गरीबांचे कल्याण हा या अर्थसंकल्पाच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी महत्वाचे वैशिष्टय.  प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर,शौचालय, नळाचे पाणी, गॅस जोडणी हे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आणि त्याच वेळी ते आधुनिक इंटरनेट जोडणी देण्याचेही उद्दिष्ट बाळगते.देशात प्रथमच हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेशांसाठी ‘पर्वतमाला’ योजना सुरू करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या योजनेमुळे डोंगराळ भागात दळणवळणाची आधुनिक साधने व्यवस्थापन होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या गंगेच्या स्वच्छतेसोबतच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये नदीकाठच्या नैसर्गिक शेतीला सरकार प्रोत्साहन देईल. 

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असून यामुळे गंगा रासायनिक प्रदुषणातून मुक्त होण्यास मदत होईल.

अर्थसंकल्पातील तरतुदींचा उद्देश कृषी क्षेत्राला किफायतशीर आणि नवीन संधी निर्माण करून परिपूर्ण करणे असा आहे. नवीन कृषी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी पॅकेज यासारख्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. एमएसपी खरेदीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 2.25 लाख कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित केले जात आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

कर्ज हमीमधील विक्रमी वाढीसोबतच अनेक योजनांची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशांतर्गत उद्योगासाठी अर्थसंकल्पातील संरक्षण भांडवलाच्या 68 टक्के आरक्षणामुळे भारतातील एमएसएमई क्षेत्राला मोठा लाभ होईल. 7.5 लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल आणि लहान तसेच इतर उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होतील,” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी अर्थमंत्री आणि त्यांच्या चमुचे ‘लोकस्नेही आणि प्रगतीशील अर्थसंकल्प’अशी प्रशंसा करत ,त्यांचे अभिनंदन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.