थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा -मुख्य अभियंता सचिन तालेवार यांचे निर्देश

औरंगाबाद,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   ग्राहकांना सुरळीत विद्युत सेवा देतानाच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली होणे आवश्यक आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबवावी, असे निर्देश महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत.      

औरंगाबाद ग्रामीण विभाग-१ व २ तसेच कन्नड विभागातील जवळपास ८०० अभियंते व जनमित्रांशी मुख्य अभियंता तालेवार यांनी बुधवारी (१ फेब्रुवारी) औरंगाबाद, वैजापूर व कन्नड येथे विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी तालेवार म्हणाले की, ग्राहकांना गतिमान सेवा व सुरळीत विद्युतपुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. त्याबरोबरच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे. महावितरण ही ‘ना नफा’ तत्त्वावर काम करणारी सार्वजनिक सेवा कंपनी आहे. ग्राहकांना आपण जी वीज देतो, ती आपल्याला वीजनिर्मिती कंपन्यांकडून रोख खरेदी करावी लागते. त्यामुळे वीजबिलांचा ग्राहकांनी नियमित भरणा करावा, यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. जे ग्राहक वीजबिलांचा भरणा करण्यास दाद देत नाहीत, त्यांचा विद्युतपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित झालाच पाहिजे, अशा सक्त सूचना तालेवार यांनी दिल्या.       

कृषिपंपाच्या प्रलंबित वीजजोडण्या देण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२२ पर्यंत जे ग्राहक पैसे भरून प्रलंबित आहेत, त्यांना तातडीने वीजजोडण्या देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, औरंगाबाद ग्रामीण विभाग- १ चे कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, औरंगाबाद ग्रामीण विभाग- २ चे कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर, कन्नड विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने यांच्यासह उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते उपस्थित होते.