मुर्तीवेसच्या नागरी समस्या न सुटल्यास महाराष्ट्र दिनी जिल्हा कचेरी समोर उपोषण : महेश धन्नावत यांचा इशारा

जालना,२३ एप्रिल  /प्रतिनिधी :- जालना  शहरवासीयांना वाहतूकीसाठी जटील ठरलेला मुर्तीवेस पुर्ननिर्माणचा प्रश्न, पाईपलाईन अंथरण्याच्या नावाखाली खोदून ठेवलेले रस्ते, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश प्राप्तीनंतर ही उघड्या चेंबर वर ढापे टाकण्यास नगर परिषदेकडून होत असलेली टाळाटाळ, या पार्श्वभूमीवर नागरी समस्या न सुटल्यास महाराष्ट्र दिनी जिल्हा कचेरी समोर उपोषण करण्याचा इशारा माहिती सेवा संघाचे  जालना जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत यांनी दिला आहे. 
या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, नागरी समस्या सोडवण्याबाबत आपण नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासनाकडून योग्य पाऊले उचलण्यात आली नाहीत. रस्त्यावर निर्माण केलेल्या भुयारी गटरांवर काही ठिकाणी  ढापे टाकण्यात आले नाही. बडी सडक, भावसार गल्ली व बालाजी गल्ली परिसरात पाईपलाईन अंथरण्याच्या नावाखाली  खोदून ठेवलेल्या रस्त्यांमूळे लहान बालके, महिला व नागरिकांना ञास सहन करावा लागतोय, सदर रस्तांची कामे करावीत अशी मागणी अॅड. महेश धन्नावत यांनी केली. शहरातील रहदारी च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मुर्ती वेसचे पुर्ननिर्माण गत अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. आपण जिल्हा प्रशासन, पालकमंत्री, विभागीय आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करून ही रखडलेली समस्या तशीच असून नागरी समस्या तात्काळ न सोडविल्यास जिल्हा कचेरी समोर उपोषण करण्याचा इशारा अॅड. महेश धन्नावत यांनी लेखी निवेदनात दिला आहे.