मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील दोन तरुणांची आत्महत्या 

हिंगोलीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासाठी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत एका तरुणाने आपल्या जीवनाचा अंत केला. या घटनेला काही तास उटलत नाही तोवर मराठवाड्यात दुसऱ्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने देखील आत्महत्या करण्यापूर्वी शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असं या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आरक्षण मिळत नाही तोवर माझ्यावरती अंत्यसंस्कार करु नका, असं एका शाळेतील पाटीवर लिहुन या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गणेश कुबेर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकरी गावकऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे. तर, घटनास्थळी चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहचले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलाला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी आश्वास मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नसून अत्यसंस्कार देखील करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मागे पत्नीसह दोन मुलं आणि आई-वडील असा परिवार आहे.

२३ वर्षीय नवनाथने घेतला गळफास

हिंगोली,२६ ऑक्टोबर / प्रतिनिधी :- हिंगोलीत एका तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडी बाळापूर शेवाळा शिवारातील ही घटना आहे. मराठा समाजातील युवकाने चिठ्ठी लिहून झाडाला गळफास लावत जीव संपवल्याची घटना समोर आली आहे. नवनाथ उर्फ यशवंतराव कल्याणकर असं या मुलाचं नाव आहे. मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे. अशी चिठ्ठी या २३ वर्षीय तरुणाकडे सापडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ हा देवजणामध्ये राहत होता. शेतामध्ये काम करत होता. सोयाबीम कापणीचं काम करत असताना शेतशिवारात मळणी यंत्र सुरु ठेवत त्याने एकाएकी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होतं. तेव्हा मजूरांनी त्यांना आवाज दिला. मात्र, आवाज दिल्यानंतर देखील नवनाथ कल्याणकर आढळून येत नसल्याने मजूरांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. यावेळी नवनाथ मजूरांना एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यांना नवनाथच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात त्यांनी मी मराठा आरक्षणामुळे जीव देत असल्याचं लिहिलेलं आढळून आलं.