कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जालना शहरामध्ये 5 जुलैपासुन लॉकडाऊन — जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

Image may contain: 2 people, people sitting, table, child, hat, wedding and indoor

जालना, दि. 3 – जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन बाधितांची अधिक संख्या जालना शहरामध्ये आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखून विषाणुची साखळी तोडण्यासाठी पदाधिकारी, प्रशासन व जनता यांनी एकत्रित येऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने रविवार दि. 5 जुलै, 2020 रोजी रात्री 12-00 वाजेपासुन संपुर्ण जालना शहरामध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह नगरपालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सुचना तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार जालना शहरामध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी सर्व पदाधिकारी व जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे असुन विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये. पल्स ऑक्सीमीटरच्या नियमित वापरामुळे आपल्याला शरीरातील एसपीओ२ तसेच ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने आपण स्वत: याचा नियमित वापर करत असल्याचे सांगत या ऑक्सीमीटरचा वापर करुन प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो. 94 पेक्षा लेव्हल कमी असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधल्यास तातडीने उपचार करणे सोईचे होत असल्याने प्रत्येकाने याचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जालना शहरामध्ये प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या प्रभागातील एकही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही याची समितीने दक्षता घ्यावी. प्रभागामध्ये जनतेला आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीही समितीने आवश्यक ती मदत करावी. यासाठी समितीला प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेला वैद्यकीय सेवेची आवश्यकता असल्यास डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची समिती मार्फत तपासणी करुनच यासाठी सुट दिली जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जालना शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांना मधुमेह, ऱ्हदयविकार यासारखे आजार असतील अशा वयोवृद्ध व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असुन सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समितीने आवश्यक ते सहकार्य करावे. कोरोनाबाधितांचा अहवाल त्वरित देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आलेली असुन या किटस उपलब्ध झाल्यास त्यामार्फतही तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
येत्या ५ जुलैपासुन जालना शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता तसेच सामाजिक अंतराचे पालन करुनच खरेदी करावी. लॉकडाऊनच्या काळात कोणीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, गेल्या शंभर दिवसापेक्षा अधिक कालावधीपासुन लोकप्रतिनिधी, वैद्यकीय, पोलीस तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी काम करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन जालना शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिकेतील सर्व पदाधिकारी प्रशासनाच्यासोबत आहेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तु नगरसेवक व त्यांच्या समितीमार्फत त्यांना पोहोच करण्यात येणार असल्याचे सांगत ज्या प्रभागामध्ये उत्कृष्ट काम करण्यात येईल, अशा नगरसेवकाला त्यांच्या वार्डाचा विकास करण्यासाठी आमदार निधीमधुन २० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्षा श्रीमती गोरंट्याल म्हणाल्या, सर्वानुमते घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण असुन विषाणुची साखळी तोडुन जालना शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व नगरसेवकांचे म्हणणे सभागृहाने ऐकले. यात सर्वात किमान १० दिवस कडक लॉकडाऊन करण्याविषयी आग्रही भुमिका नगरसेवकांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *