स्वच्छता मोहिमेचे रूपांतर शाश्वत लोकचळवळीत करण्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आवाहन

छत्रपती संभाजीनगर,१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ‘स्वच्छता हीच सेवा या मोहिमे’चा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक तारीख एक तास एक साथ’ या  श्रमदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्रातील केंद्रीय संचार ब्यूरो (सी बी सी)) च्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्र येऊन स्वच्छतापूर्तीच्या दिशेने पाऊल पुढे टाकले. स्वच्छता आणि पर्यावरणविषयक जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांच्या सहभागाने प्रत्येकी एक तास चालणाऱ्या या  स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.  या मोहिमेमध्ये विविध मान्यवरांचाही सहभाग होता. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधील उपक्रमांचे नेतृत्व केले.

सी बी सी च्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये बोलताना डॉ. भागवत कराड यांनी पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून या उदात्त कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सहभागींचे कौतुक केले. माणसाचे  आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल, तर दररोज 2 तास परिसर स्वच्छ करणे हा एक चांगला मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेचे रूपांतर चिरंतन लोकचळवळीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लेणी इथे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी,  संभाजीनगर प्लॉगर्स हा सकाळी धावण्याचा व्यायाम करता करताच कचराही गोळा करणाऱ्यांचा गट, नेहरू युवा केंद्र संघटना (एन वाय के एस), राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ए एस आय) ची स्थानिक शाखा एकत्र आले होते.