गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३५० गडकिल्ल्यांवर ४१८ आयटीआय राबविणार स्वच्छता मोहीम

मुंबई,१ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- शिवछत्रपती यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. यावेळी  ते बोलत होते.

कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता  आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता मंत्री  मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करीत आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात 221 सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार 17 सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे :  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

भारत हा सर्वात मोठी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भविष्यात स्वच्छ देश म्हणून जगात भारताची ओळख निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील अशाच प्रकारे स्वच्छ व स्वस्थ भारत ही संकल्पना अभिप्रेत होती. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची स्वच्छता हा नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम  विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेची संकल्पना रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगून, लोकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड् नार्वेकर यांनी यावेळी केले.

कौशल्य विकासासोबत लोकाभिमुख कार्यक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग: मंत्री मंगल प्रभात लोढा

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना या उपक्रमाद्वारे अनोखी मानवंदना देण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या ४०० आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

यावेळी ऑल इंडिया ट्रेड ट्रेनिंग (AITT) सन 2023 च्या परीक्षेत मुंबई शहर आय.टी. आय. च्या  मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडमध्ये ऋतुजा पवार, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जान्हवी धोडींदे यांनी देशात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दुर्ग मित्र संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, मराठा वॉरियर्स, संत निरंकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  संत निरंकारी प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले.