‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नागरी भागात १६ लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘एक तास’ स्वच्छतेद्वारे राज्यात १९४२ टन कचऱ्याची विल्हेवाट

मुंबई,१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत आज राज्यात ‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील  सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या पंधरवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज एक तास विशेष मोहीम राबविण्यात आली. यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज आदींनी गिरगाव चौपाटी येथे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी शिवडी किल्ला येथे, उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी बारामती येथे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध ठिकाणी या अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली.

या अभियानात मान्यवरांसोबत विविध सामाजिक संस्था, इंडियन मेडीकल असोशिएशन, क्रेडाई, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, आरबीआय, एसबीआय, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ इंडिया या बॅंका, इंडियन टुरिझम, लायन्स क्लब, रोटरी क्लब, माउली फाउंडेशन, शिवदुर्ग  ट्रेकर्स फाउंडेशन, बचत गटांचे सदस्य आदींनीही उत्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता केली.

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गत नागरीकांच्या सहभागाने जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, नदीघाट, जलस्त्रोत, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रहालय, गो-शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, आरोग्य संस्थाचा परिसर, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

जनतेच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वच्छता करणे व स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून सर्व नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दिली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य (झाडू, कचरा पेट्या, थैल्या इत्यादी) सबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा प्रक्रिया केंद्रावर योग्य ती विल्हेवाट लावण्यात  आली.

स्वछता ही सेवा उपक्रमात जनमानसाने श्रमदान करून सहभाग नोंदवला

२ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या  महात्मा गांधीजी यांच्या जयंतनिमित्त त्यांना आदरांजली देणे हेतूने   *एक ऑक्टोबर एक तास स्वच्छतेसाठी  श्रमदान*   या उपक्रमा अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ भागवत कराड व संदीपान भूमरे ​(पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर​)​यांच्या हस्ते झाले. 

  आज महानगरपालिकेच्या वतीने शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पासून ते क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,सौरभ जोशी,उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा,उप आयुक्त मंगेश देवरे,नंदा गायकवाड,सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना राणे,कार्यकारी अभियंता बी डी फड,आर एन संधा,सहायक आयुक्त संजय सुरडकर,रमेश मोरे,जिल्हा व्यापारी महासंघ प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, एकोसत्व चे प्रतिनिधी,डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सदस्य प्लॉग्गर्स ग्रुप, सेवाभावी संस्था व मनपा अधिकारी ,कर्मचारी,नागरी मित्र पथक कर्मचारी,महिला बचतगट प्रतिनिधी ,नागरिक,शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

   यावेळी मार्गदर्शन करताना डॉ भागवत कराड यांनी स्वच्छ्तेचे महत्व सांगितले.ते पुढे म्हणाले की जेथे स्वच्छता तेथे धन्वंतरी असते.त्यामुळे सर्वांनी स्वच्छता बाबतीत नेहमी जागरूक असले पाहिजे.

शहागंज ते क्रांती चौक या मार्गावर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.या वेळी रस्त्याच्या कडेला असलेला कचरा गोळा करण्यात आला.यात प्लॅस्टिक कचरा जास्त प्रमाणात होता.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ​ स्वच्छता संदेश व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.झोन क्र ०१ व ०२ यांच्या वतीने  विविध ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार  शहरांमध्ये ​५६२ ठिकाणी  स्वच्छतेचे  कार्यक्रम हाती घेण्यात आले.यामध्ये एकूण ​६३ टन कचरा गोळा करण्यात आला असून सदरील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला 

 यामध्ये शहरातील सर्व  प्रशासकीय प्रभाग व ​११५ वॉर्ड मध्ये स्वच्छतेचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये  महानगरपालिका शाळा , मुख्य रस्ते , वॉर्डातले अंतर्गत रस्ते, शहरातील  महानगरपालिका शासकीय दवाखाने, व्यवसायिक ठिकाणे , रेल्वे स्टेशन बस स्टँड, पर्यटन स्थळे, लेणी परिसर पर्यटन मंडळ , बाजारपेठ व खाम नदी परिसर इत्यादी ठिकाणी श्रमदान करण्यात आले.