छत्रपती संभाजीनगरातील पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील

  • तीन दिवसीय वार्षिक परिषदेचा थाटात समारोप
  • ऑपरेटर परिसरातील ठिकाणे पाहण्यासाठी सज्ज

छत्रपती संभाजीनगर,१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शहरात सुरु असलेल्या तीन दिवसीय इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) च्या परिषदेचा समारोप रविवारी सायंकाळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील असल्याची ग्वाही संघटनेतर्फे देण्यात आली.

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आयटोचे अध्यक्ष राजीव मेहरा, उपाध्यक्ष रवी गोसाईं, रजनीश कायस्थ, सचिव संजय राजदान, समन्वयक जसवंत सिंग, सुनीत कोठारी, विनय त्यागी, माजी अध्यक्ष प्रोनोब सरकार, जितेंद्र केजरीवाल यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘आपल्या देशातील वारसा प्रचंड आहे. अनेक आक्रमकांनी त्यावर प्रहार करून बरेच काही नष्ट केले. पण जे आहे ते दाखवण्यासाठी आमच्याकडे खूप आहे. देशाला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा राहणार आहे. भविष्यात पर्यटन अधिक सोयीचे होण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यास आपण प्रयत्न करणार आहे’.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, ‘छत्रपती संभाजीनगर उद्योग क्षेत्रात पुढे गेले आहे. आता पर्यटनात पूढे जाण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह ऑपरेटर्सनी आपल्या ग्राहकांना करावा. याच्याच माध्यमातून येथील पर्यटनाचा कालावधी अधिक दीर्घ होईल. या परिषदेचा एक अहवाल तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो सुपूर्द केला जाईल’.

आयटो अध्यक्ष राजीव मेहरा म्हणाले, ‘या शहराला दोन विमानतळे आहेत. आयटोच्या वतीने छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिकमधील वाईन उद्योग आणि त्र्यंबकेश्वरला प्राधान्य दिले जाणार आहे’. प्रधान सचिव (महाराष्ट्र पर्यटन) राधिका रस्तोगी यांनी ऑपरेटर्सना मुंबई येथील काला घोडा फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

समन्वयक जसवंत सिंग यांनी आयटो परिषद छत्रपती संभाजीनगरसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचे सांगितले. सध्या ३-४ महिन्यांवर असलेला हा व्यवसाय या परिषदेनंतर अधिक वाढेल आणि वर्षभराचा होईल. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वेरूळ येथील कैलास लेणी रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवावी अशी मागणी त्यांनी भाषणाचा समारोप करताना केली.

अंतिम दिवसाची सुरुवात ५ किमी ‘रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिजम’ने झाली. नंतर कनेक्टिव्हीटी (रेल, रोड, हवाई) या विषयावर तज्ज्ञांनी आपली मते मांडली. छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन अडचणी आणि त्यावरील उपायांवर सुनीत कोठारी यांनी संचलित केलेल्या सत्रात पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांनी आपली मते व्यक्त केली.विविध स्पर्धकांच्या आणि प्रायोजकांच्या सत्कार समारंभाने अंतिम दिवसाची सांगता झाली.