नशेच्‍या गोळ्या व औषधीची विक्री करणाऱ्याला अटक

औरंगाबाद,१६ मे /प्रतिनिधी

नशेच्‍या गोळ्या व औषधीची विक्री करणाऱ्याला   सिटीचौक पोलिसांनी पाठलाग करुन रविवारी दि.१६ पहाटे अटक केली. ही कारवाई चेलीपुरा चौकात करण्‍यात आली.शेख अतिक शेख अब्दुल्ला (४४,  रा. खत्री हॉस्‍पीटल जवळ, चेलीपुरा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला बुधवारपर्यंत दि.१९ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्‍याचे उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे (४०) यांनी फिर्याद दिली.  १५ मे रोजी रात्री महांडुळे व त्‍यांचे पथक हद्दीत सुरु असलेल्‍या अवैध धंद्यांना आळा घालण्‍यासाठी गस्‍त करित होते. त्‍यावेळी चलीपुरा चौकात रेकॉर्डवरील सराईत गुन्‍हेगार शेख अतिक दिसला, त्‍याच्‍या हातात एक प्‍लास्‍टीकची बॅग होती. त्‍याने पोलिसांना पाहताच तेथुन धूम ठोण्‍याचा प्रयत्‍न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्‍याला पकडले. बॅगेची झडती घेतली असता, त्‍यात १३ हजार ३१९ रुपये किंमतीच्‍या नशा आणाणार्या गोळ्या आणि औषधी सापडली. पोलिसांची त्‍याची चौकशी केली असता, त्‍याने उडवा उडवीची उत्‍तरे दिली. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नीता  किर्तीकर यांनी आरोपी विरोधात यापूर्वी ही अशा प्रकारचे गुन्‍हे दाखल आहेत. आरोपीकडे सापडलेल्या नशेच्‍या गोळ्या आणि औषधी त्‍याने कोणाकडून आणल्‍या, कोणाला विक्री करणार होता याचा तपास करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीचे शहरात आणि परराज्‍यात साथीदार असण्‍याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्‍या दृष्‍टीने तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.