मराठवाड्यावरील अन्यायाविरुद्ध लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड,विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

औरंगाबाद ,१८जून /प्रतिनिधी :- मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप गाेविंदराव देशमुख (वय ६७) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मुकुंदवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.

त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर, खंडपीठ वकील संघाचे सचिव शहाजी घाटाेळ पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील बेलकूंड हे त्यांचे मुळ गाव आहे. औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन्यासाठी केलेल्या संघर्षात त्यांनी हिरारीने पुढाकार घेतला होता.

पद्मविभूषण गाेविंदभाई श्राॅफ यांनी मराठवाड्याच्या विकासाची तळमळ असल्याचे पाहून देशमुख यांच्यावर जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी साेपवली. त्यामाध्यमातून देशमुख यांनी जायकवाडीला मिळणाऱ्या ८० ते ८२ टीएमसी पाण्याचा प्रश्न, भाई व विजयेंद्र काबरा यांच्या पाठबळाने मराठवाड्यातील वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाटेला येणाऱ्या अपुऱ्या जागांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हाेणाऱ्या अन्यायाची बाजू न्यायालयात मांडली. त्यातून वैद्यकीयच्या १५० तर अभियांत्रिकीच्या ७५० जागा वाढवून मिळाल्या.

सिडकाेला कुठल्या सुविधा मिळत नसल्याच्या प्रश्नावर दाखल याचिकेवरून खंडपीठाने अॅड. प्रदीप देशमुख यांच्या नावे आयाेग स्थापन करून अहवाल मागवला व त्याआधारे एक स्यूमाेटाे याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर सिडकोने २००२ पर्यंत सुमारे २२ हजार अतिक्रमणे हटविली. सिडकाेतील रस्ते, संत तुकाराम नाट्यगृह, बाॅटनिकल गार्डन, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्न मार्गी लागले.

अॅड. देशमुख यांनी राजीव गांधी यांच्या विचाराने प्रभावित हाेऊन राजीव गांधी इंटलॅक्च्युअल फाेरमची स्थापना केली. त्यामाध्यमातून राज्यभर संघटन केले हाेते. मराठवाड्यातील बलस्थाने आणि दुर्बलता हा प्रकल्प हाती घेऊन परभणीचे डाॅ. के. के. पाटील यांच्या सहकार्याने माेठा ग्रंथही तयार केला हाेता.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी त्यांनी पोटतिडकीने न्यायालयात बाजू मांडली. त्यांच्या जनहित याचिकेतील आदेशांमुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पाेटतिडकीने मांडणारा विधिज्ञ हरपल्याची भावना व्यक्त हाेत आहे.

जनहित याचिका करणारे वकील-अॅड.शशिकुमार चौधरी

स्व.प्रदीप देशमुख लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांचे वडील गर्भ श्रीमंत होते.त्यांच्याकडे भरपूर जमीन होती.त्यांचे वडील शेती करीत असत.स्व.प्रदीप देशमुख यांनी एल एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरु केला.

बॅरिस्टर गाडगीळ लोकसभेचे सदस्य झाल्यानंतर स्व.प्रदीप देशमुखही दिल्लीला गेले.ते तेथे लोकसभेत नोकरीला लागले. औरंगाबाद येथील वकिल संघाचे एक प्रतिनिधी मंडळ औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून पंतप्रधान याना निवेदन देण्यासाठी गेले होते.त्यावेळी स्व.प्रदीप देशमुख यांच्यामुळे बॅरिस्टर गाडगीळ यांनी त्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

स्व.प्रदीप देशमुख हे जनहित याचिका करणारे वकील म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध पावले होते.त्यांनी मराठवाड्याला हक्काचे गोदावरीचे पाणी मिळायला पाहिजे म्हणून बऱ्याच याचिका उच्च न्यायालयात केल्या होत्या. ते मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना करिता उच्च न्यायालयात एकटे लढले.त्यांच्या वयाचा विचार केला तर त्यांच्यावर एवढ्या लवकर मृत्यू ओढावेल असे वाटत नव्हते.

कर्तृत्वाचा वेगळा ठसा-अॅड.सतीश तळेकर

श्री. प्रदीप देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमठवला. विद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धेतील पुष्कळदा त्यांचा गौरव झाला व त्याबाबत बक्षीसे देखील मिळाली.  पुण्यातील प्रख्यात आय. एल. एस. विधी महाविद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. 

भारत शासन दिल्ली येथे उच्च पदावरील नौकरी सोडून मुंबई उच्च न्यायालयात श्री. एस जे देशपांडे (श्रीराम पंडत) यांचाकडे सुरुवातीला प्रशिक्षण घेतले. औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

सन १९८१ ते १९८६ या काळात दैनिक लोकमत मध्ये कायद्यातील नवीन घडा-मोडी बद्दल सदर लिहीत असत. त्यातुनच त्यांची एक परिपक्व विधिज्ञ म्हणुन मराठवाड्याला ओळख झाली. मराठवाडातील  सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीत ते नेहमी अग्रेसर असत. मराठवाड्याच्या विकासात दिवंगत श्री. गोविंदभाई श्रॉफ यांचे अनुयायी म्हणून व नंतर पुढे त्यांचा वारसा चालवला. 

जायकवाडी जलाशयातील पाण्याचा प्रश्न, मराठवाड्यातील रेल्वेचे जाळे व विस्तार करण्याकरिता त्यांचे प्रयत्न कायम स्मरणात राहतील. 

विद्यार्थी जीवनापासून राजकारणाची आवड असल्याने नागपूरचे श्री. वसंत साठे, पुण्याचे बॅरिस्टर गाडगीळ, लातूरचे श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांना ते राजकीय गुरु मानत. तसेच त्यांचे समकालीन श्री. विलासराव देशमुख, श्री. प्रमोद महाजन, श्री. गोपीनाथ मुंडे यांचा सोबत जिव्हाळयाचे संबंध होते. व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असूनही सक्रिय राजकरण करता आले नाही, याची खंत अखेरपर्यंत राहून गेली. 

सिडको मधील  नवीन वसाहतीतील सर्व सुख-सुविधा मिळाव्यात म्हणुन  त्यांनी दाखल केलेली जनहित याचिका बरीच गाजली.  

श्री. देशमुख यांच्या अकाली निधनाने  समाजाचे विशेषतः वकील व्यवसायाचे अपरिमित नुकसान झाले आहे.