विष्णूपुरी धरणाचे एक गेट उघडले,471 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

नांदेड​,१८जून /प्रतिनिधी :​-​

नांदेड शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच विष्णूपुरी धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या धरणाचे एक गेट उघडण्यात आले असून त्यातून 471 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शिवाय अनेक छोट्या नद्यांना पूर आला असून किनवट-नांदेडचा संपर्क तुटला होता. 

नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला नसला तरी गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प पावसाच्या सलामीलाच भरला होता. सध्या या प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आज दुपारी या धरणाचे एक गेट उघडण्यात आले. त्यातून 471 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक अशीच सुरू राहिली तर आणखी काही दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. 

किनवट ते नांदेड राष्ट्रीय रस्ता क्रमांक 161 चे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावरील बेल्लोरी-धानोरा ते बोधडी या दरम्यान मजबुतीकरणाचे काम अद्याप सुरू झाले नाही. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील व नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता पूर्ण चिखलमय झाला. त्यामुळे काल सायंकाळपासून ते आत्तापर्यंत किनवट ते नांदेड महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. तब्बल 2 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने शेकडो वाहने अडकून पडली. गेल्या 4 वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. मुदत संपूनही हे काम पूर्ण न झाल्याने वाहनचालकांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. 

मुदखेड तालुक्यात काल झालेल्या पावसाने मेंढका नदीला पूर आला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या पुलाचे काम करण्यासाठी 2 कोटी 77 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. 2019 मध्ये या पुलाचे उद्घाटन झाले खरे, परंतु कंत्राटदाराने अर्धवट काम सोडून पळ काढल्याने नागरिकांच्या गैरसोयीत आणखीनच भर पडली आहे. भोकर-उमरी रस्त्यावर रायखोड लगत पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दीड तास वाहतूक थांबवण्यात आली होती. पुलावरून जाणारे पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू झाली. 

नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असला तरी घाईगडबडीत पेरणी करू नका असा सल्ला कृषिविभागाने दिला आहे.