दिलासादायक : लातूरातून कोरोना ओसरतोय

रुग्ण बरे हेाण्याचे प्रमाण वाढू लागले, तर रुग्णांची आकडेवारीही घटली

लातूर  ,२८ एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारपासून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. सगळीकडे कहर झाल्याने शासनाने १५ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध घातले, तर २१ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन केला. त्याचाच परिणाम म्हणून लातूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ओसरू लागली असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याची दिलासादायक आकडेवारी येत आहे.

जिल्ह्यात १५ एप्रिलपासून राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. तरीही लोक पोटापाण्याच्या निमित्ताने बाहेर दिसू लागले. त्यामुळे कडक लॉकडाऊनची मागणी पुढे येऊन तशी अंमलबजावणी सुरू झाली. सोमवारी (दि. २६) सायंकाळी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०६९ आली. आठवडाभरापूर्वी अठराशेवर गेलेला आकडा आज ओसरल्याने कोरोना कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २० एप्रिल रोजीचा अहवाल पाहता पॉझिटिव्ह रुग्ण १४७७, तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण १४३१ होते. २१ रोजी पॉझिटिव्ह रुग्ण १६६८ आढळले, तर १६०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २२ रोजी १२६९ पॉझिटिव्ह आढळले, तर १३०९ बरे झाले. २३ रोजी १४७८ पॉझिटिव्ह आढळले, तर १७७५ लोक कोरोनामुक्त झाले. २४ रोजी १४०० लोकांना कोरोना झाला, तर १७०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. २५ रोजी १५२२ जण बाधित आढळले, तर १६४४ जण बरे झाले. आज सोमवारी १०६९ जण पॉझिटिव्ह आढळले, तर १७२५ लोक यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
दरम्यान, आज सोमवारी दिवसभरात आरटी-पीसीआरच्या १८२० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४४२ लोक पॉझिटिव्ह आढळले. तर ५५३ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. रॅपिड ॲँटिजेन चाचण्या २६१० करण्यात आल्या. त्यात ६२७ पॉझिटिव्ह आढळले. असे एकूण १०६९ लोक पॉझिटिव्ह आढळले. २४ एप्रिल रोजी ४ व २५ एप्रिल रोजी २० असे एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. दिवसभरात १७२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची आतापर्यंतची आकडेवारी पाहता एकूण ११५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६६५४८ जणांना बाधा झाली, तर ५०८०८ लोक कोरोनामुक्त झाले. सध्या विविध कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये ४५७५ व होम आयसोलेशनमध्ये १०००९ रुग्ण उपचार घेत आहेत.