वैजापूर-गंगापूर तालुक्यातील वीस जिल्हा परिषद शाळांना ६० लाख रुपये निधीचे क्रीडा साहित्य मंजूर

वैजापूर ,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शासनाच्या क्रीडा विभागाच्या अनुदानांतर्गत वैजापूर विधानसभा मतदार संघातील वीस जिल्हा परिषद शाळांना ६० लाख रुपये निधीचे क्रीडा साहित्य मंजूर झाले असून या क्रीडा साहित्याचे वाटप आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते कापूसवाडगाव येथे सोमवारी करण्यात आले.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये  खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून क्रीडा विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात येत आहे. वैजापूर-गंगापूर तालुक्यातील वीस जिल्हापरिषद शाळांना ६० लाखांचे क्रीडा साहित्य  आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून,मंजूर झालेल्या क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील कापूसवाडगाव येथील जिल्हापरिषद शाळेला ३ लाख रुपये निधीचे क्रीडा साहित्य आ.बोरणारे यांच्याहस्ते सोमवारी वाटप करण्यात आले.या क्रीडा साहित्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य वाढविण्यासाठी मदत होणार असून , जागतिक  दर्जाचे खेळाडू आपल्या गावातून घडावेत असे आ.बोरणारे यांनी याप्रसंगी सांगितले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, उपतालुकाप्रमुख अनिल चव्हाण,कल्याण पाटील जगताप,सरपंच आशाबाई धामणे,उपसरपंच नितीन थोरात, शालेय समितीचे अध्यक्ष अर्जुन तेलंगे, मुख्याध्यापक राजेंद्र शेळके यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.