अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १० व ११ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर,७ जानेवारी / प्रतिनिधी :-अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथील देशपांडे पूरम परिसरात अरुण देशपांडे यांच्या निवासस्थानी १० व ११ जानेवारी रोजी होणार आहे. 

या बैठकीत देशभरातील  विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ग्राहक जागृतीचे काम तळागाळातील शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच ग्राहक शोषण थांबवण्यासाठी, ऑनलाईन , ई – मार्केटच्या तसेच सायबर क्राईम च्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक, याबाबत विशेष ग्राहक जनजागृती कशी करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे. ग्राहक हिताचे झालेले नवीन कायदे यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. 

या बैठकीला देशभरातील विविध राज्यातील ३८ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.  यामध्ये जम्मू कश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, बिहार, गुजरात, महाराष्ट्र अशा विविध राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देशातील ग्राहक चळवळीतील सर्वात मोठी ग्राहक संघटना असून या संघटनेचे देशभरातील विविध राज्यात हजारो शाखा आहेत. गेल्या ५०  वर्षात ग्राहकांना न्याय मिळवून देणारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक प्रमुख संघटना म्हणून ओळखली जाते. देशातील ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आणण्यासाठी तसेच २४ डिसेंबर हा केंद्र सरकार द्वारा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे खरे श्रेय अखिल भारतीय ग्राहक पंचायतला जाते. सुवर्णजयंती उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. श्री मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा  आढावा घेतला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शाह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे.  या बैठकीस राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, राष्ट्रीय सहसचिव जयंतभाई कथेरिया,  सह सचिव नेहा जोशी ( रत्नागिरी),  एम एन सुंदर ( चेन्नई ), रामलेश सवाई ( ओरिसा) यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहे.

या बैठकीत समालखा हरियाणा येथे झालेल्या सुवर्ण जयंती वर्ष कार्यक्रमाच्या अनुषंगाने अहवाल सादर केला जाणार आहे. तेथील झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर चर्चा करून इतिवृत्तांचा मान्यता दिली जाणार आहे. पर्यावरण, प्रचार प्रसार, महिला, विधी, रोजगार सृजन ,अभ्यास मंडळ अशा विविध विषयांवर ग्राहक पंचायतीची पुढील दिशा ठरणार   आहे.  अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण जयंती वर्षा निमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाबाबत चर्चा होणार आहे.   देशात प्रत्येक गावात तळागाळात ग्राहक जनजागृती चे कार्य विस्तार केला जाणार आहे.  या बैठकीत देशभरातील ग्राहक पंचायत प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ग्राहक पंचायत चे कार्य देशातील प्रत्येक तालुक्यात तसेच गावोगावी पोहोचण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. ग्राहक पंचायत च्या संघटनात्मक बांधणी बरोबरच देशभरातील ग्राहकांना जनजागृती करण्याबाबत विशेष मोहीम राबविली जाणार आहे.  ग्राहक पंचायत गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे एमआरपी धोरणाबाबत सुसंगत निर्णय घेण्याबाबत आग्रही आहे. “उत्पादन मूल्य निर्धारण नीती ” असणे आवश्यक आहे . 

किंमत आणि उत्पादनाची तारीख छापणे बंधनकारक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे लावून धरलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. एक जानेवारीपासून वस्तूंच्या वेस्टनावर उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग तारीख आणि युनिट विक्री किंमत छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे फार मोठे यश मानले जाते. त्यासाठी सरकारने पॅकेजिंग विषयक नियमात बदल देखील केला आहे. अलीकडेच ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की एक जानेवारीपासून नव्या नियमाचे पालन बंधन करण्यात आले आहे. आतापर्यंत किमती सोबत उत्पादन तारीख अथवा आयात तारीख अथवा वस्तू पाकीट बंद करण्याची तारीख छापण्याचे पर्याय दिले होते. आता मात्र किमती सोबत केवळ उत्पादन तारीख छापावी लागेल. ग्राहक मंत्रालयांनी यासंबंधीचे अधिक सूचना जारी केली आहे. सुट्ट्या पाकीट बंद वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याने वेस्टनावर किंमत व उत्पादन तारीख असणे आवश्यक आहे. वस्तूंच्या वेस्टनावर एमआरपी लिहिणे अनिवार्य केले आहे, मात्र त्यासाठी निश्चित धोरण नसल्याने ग्राहकांचे शोषण होते आहे . मुख्य म्हणजे औषधावरील एम आर पी इतकी भ्रामक आहे की किती तरी पट सूट विक्रेते ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी देतात .  ग्राहकांच्या हितासाठी असाही आग्रह आहे की, सरकारने अर्थशास्त्राच्या आधारे अनुरूप एक सूत्र तयार करून त्याआधारे उत्पादक आणि उत्पादन यावर एमआरपी निश्चित करावी.  त्यामुळे ग्राहकांची लूट होणार नाही.  सन २०२४ हे वर्ष सुवर्ण जयंती उत्सव म्हणून ग्राहक पंचायत देशभरात साजरे करत असून या विषयांबरोबर अन्य विषयांवर बाबत तसेच ऑनलाईन खरेदी, सायबर क्राईम या माध्यमातून ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी वर्षभर ग्राहकांमध्ये जनजागृती करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ग्राहक पंचायत कटिबद्ध आहे.

१० जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. त्यानंतर संघटन मंत्र होणार आहे.  जयंतभाई कथेरिया यांचे प्रास्ताविक होऊन , समालखा येथे झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करून इतिवृत्त मंजुरी दिली जाणार आहे .तसेच सुवर्ण जयंती उत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा अहवाल सादर केला जाणार आहे. पर्यावरण, प्रचार प्रसार, महिला,  विधी, रोजगार सृजन, अभ्यास मंडळ याविषयी अहवाल सादर केला जाणार आहे.  सुवर्ण जयंती उत्सव निमित्त देशभरात ग्राहक पंचायत च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम कार्यक्रमांत बाबत विचारविनिमय केला जाणार आहे तसेच आगामी काळात ग्राहकांच्या हितासाठी राबवायच्या  कार्याची दिशा ठरविली जाणार आहे.११ जानेवारी रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप होईल. 

१० व ११ जानेवारी २०२४ अशा दोन दिवस होणाऱ्या या बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय पदाधिकारी  मंगेश भेंडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत, अशी माहिती देवगिरी प्रांत सचिव ओंकार जोशी यांनी दिली आहे. 

राष्ट्रीय पातळीवर बैठक यशस्वी करण्यासाठी देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ विलास मोरे, ओंकार जोशी, रवींद्र पिंगळीकर, ज्योती पत्की, पूजा मुंडे, धनंजय मुळे, नानक वेदी, अजिंक्य अत्रे, जयश्री देशपांडे, संगीता धारूरकर, विजय चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत