जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,१३  एप्रिल / प्रतिनिधी :-  जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार करण्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सामाजिक संस्थाच्या समन्वयाने  करावी,  असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जलसंधारण विविध योजनांच्या आढावा बैठकीत सांगितले.   

यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख उपस्थित होते. दुरदृश्यप्रणीलीद्वारे सर्व तहसिलदार,सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम व  नगरपालिकेचे मुख्यधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

            औरंगाबाद जिल्ह्याला 119 गावांचे जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत  उद्दिष्ट देण्यात आलेले असून विविध सामाजिक संस्थेच्या सहकार्याने  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार राबविले जात आहे. कृषी आणि जलसंधारण विभागाने संयुक्त आराखडे शिवार फेरीच्या माध्यमातून  पंधरा दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित समिती सदस्याना दिले.

            धरणातून गाळ काढण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या तलावांची किंवा धरणांची संख्या निश्चित करून नियोजन करावे. ही जवाबदारी भारतीय जैन संघटना, मराठवाडा ग्रामीण संस्था, अनुलोम संस्था, महसूल, कृषी व जलसंधारण  यांच्या  संयुक्त समन्वयाने पार पाडावी.

            गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या जेसीबी आणि पोकलेंड इतर यंत्रसामग्रीस लागणाऱ्या इंधनावरील खर्च प्रशासनामार्फत दिला जाणार आहे. तर इतर खर्च (सीएसआर) सामाजिक दायित्व निधीतून भागवला जाणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण

जलजीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत पाण्याच्या स्त्रोताचे पुर्नज्जीवन करण्याबरोबरच विविध तलाव, विहिरीतील गाळ काढून पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जलजीवन मिशनच्या कामाचे नियोजन जलसंधारण विभाग, ग्रामपंचायत, तालुकास्तरीय समितीने अंदाजपत्रक तयार करून तो आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा. पालकमंत्र्यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील मंजूर गावामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जाणार आहे.

अमृतसरोवर योजना प्रभावी राबविण्यात यावी

            महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या हर्सुल तलावातील गाळ काढण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. यासाठी बीजेएस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेने तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी काम करावे. अमृतसरोवर अंतर्गत आलेल्या निधीच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सूचित केले.

जलशक्ती अभियानातून शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.

जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. पाणी पुर्नज्जीवन संदर्भात योजना असून यामध्ये शाश्वत पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यात येते.  जलशक्ती अभियानाचा आराखडा तयार करून तालुका निहाय नगरपरिषदा तसेच महानगरपालिका क्षेत्रानुसार आराखडा असणार आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहिरीचे पुनर्भरण व पुर्नज्जीवन तसेच शहरातील व गावातील पाझर तलाव यांची  साठवण क्षमता वाढवण्याबाबत कामे केले जाणार आहे.

यातूनच गाळ मुक्त धरण, जलयुक्त शिवार आणि अमृतसरोवर या तिन्ही जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी असणारे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत जलसंधारण, कृषी. रोजगार हमी योजना या विभागानी पूर्ण करण्याचे श्री.पाण्डेय यांनी सांगितले. पंधरा दिवसांमध्ये जिओ टॅगिंग च्या माध्यमातून अंतिम आराखडे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.