पिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश 

औरंगाबाद, दिनांक 24 : पिंपळवाडी पिराची येथे नाथसागर व त्यामुळे 58 घरे पाण्यामुळे बाधित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने या घरकुलांचे पुनर्वसन करणे. त्याचप्रमाणे त्यांना शाश्वत निवारा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

श्री. भूमरे यांनी आज पिंपळवाडी पिराची, नायगाव आदी विविध गावांना भेटी देऊन विविध विकासविषयक कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण करून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सद्यपरिस्थितीमध्ये पाण्याचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने मुरूम रस्ता तयार करणे, त्याचप्रमाणे पाणी उपसण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था करणे व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सूचनाही दिल्या.

या गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने मजुरांनी विशेषत: महिला मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर या महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण वनविभाग, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना आदेशित केले. तसेच या मजुरांना मागणीनुसार नियमितपणे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नियोजन देखील करुन देण्याच्या सूचना केल्या.

नायगाव येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचीही पाहणी श्री. भूमरे यांनी केली. तसेच पिकांच्या नुकसानीची माहिती घेऊन शासनाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करून 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना शासनाने विहित केलेल्या दराने मदत देण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

ड्रॅगन फ्रूट रोहयोत

प्रगतशील शेतकरी नंदूअण्णा काळे यांच्या शेतात भेट देऊन फलोत्पादनामधील ड्रॅगन फ्रुट या पिकाबाबत सविस्तर माहिती घेतली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुटचा समावेश फळ पिकांमध्ये करावा, अशी आग्रही मागणी श्री. भूमरे यांनी राज्याच्या वतीने केंद्र शासनाकडे केली होती. ही बाब लक्षात घेता त्यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीची बारकाईने पाहणी करून त्याची लागवड त्याचप्रमाणे उत्पन्न याबाबत देखील सविस्तरपणे माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *