शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील-आ. विक्रम काळे

औरंगाबाद,१९ जानेवारी / प्रतिनिधी :-शिक्षक आ. स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा जोपासत शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण बांधील आहोत. शिक्षकांच्या न्याय मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी यावेळेसही शिक्षकांनी प्रथम पसंतीक्रम पाठींबा द्यावा, असे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. विक्रम काळे पत्रकार परिषदेत म्हणाले.


३० जानेवारीला होणाऱ्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने आ. काळेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन पत्रकारांशी संवाद साधला. शिवाय उस्मानाबाद येथील ढोबळे कॉम्प्लेक्समधील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सुरेश बिराजदार, मसूद शेख, सक्षणा सलगर, नितीन बागल, महेंद्र धुरगुडे, विशाल शिंगाडे, अ‍ॅड. धीरज पाटील, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, शीला उंबरे, राजकुमार मेंढेकर, बालाजी तांबे, संजय कावळे उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले, सरकार आपले असो की विरोधी शिक्षकांच्या प्रश्नांवर आपण नेहमीच सभागृहात आवाज उठविला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सुरूवात केली असतानाच कोरोनासारखे महाभयंकर संकट समोर आले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नामुळे कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यू झाले. हे महाविकास आघाडी सरकारचे यश म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत देखील आपण पाठपुरावा करून शिक्षकांची जुनी पेन्शन, शाळा अनुदान, नवीन भरती याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. महाविकास आघाडीने सकारात्मकता दर्शविली असताना राज्यात अचानक सत्ताबदल झाला. तरीदेखील मोठ्या शिकस्तीने त्रुटींच्या पूर्ततेचा शासननिर्णय तयार करून घेतला. परंतु, राज्यपालांच्या निर्णयामुळे हा शासननिर्णय निर्गमित होऊ शकला नाही. शिक्षकांच्या हितासाठी त्यांना मिळणाऱ्या २८ आजारांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती यादीमध्ये कोरोना आजाराचा देखील समावेश करून शिक्षकांना फायदा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढेही आपण शिक्षकांच्या जुनी पेन्शन, प्रचलित धोरणानुसार शाळांना शंभर टक्के अनुदान, वरीष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढणे, शिक्षकेत्तर आकृतिबंध आणि दहा-वीस तीसची वेतनश्रीणी, बिगर नेट- सेटचा प्रश्न, केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सक्षमीकरण यासारख्या प्रश्नावर कायम लढणार असून शिक्षकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
—–
उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांना आतापर्यंत ६०.२५ लाखाचा निधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील खासगी व जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना आतापर्यंत आपण ६० लाख २५ हजाराचा निधी उपलब्ध करुन दिला. निधी देत असताना संस्था कोणाची आहे हे न पाहता केवळ निकषात शाळा बसते का? एवढेच आपण पाहिले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७८ तालुक्यातील शिक्षक पुन्हा आपल्यालाच संधी देतील, असे आ. काळे यांनी सांगितले.