वैजापूर तालुक्यात शिवसंपर्क मोहीमेला प्रतिसाद ; खैरे यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :-भाजपाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर तालुक्यात २० व २१ जुलै रोजी दोन दिवसीय शिवसंपर्क मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत पहिल्या दिवशी गुरुवारी तालुक्यातील जातेगाव , विरगाव व वैजापूर शहरात माजी खासदार यांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी विरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपवाले पैसे देऊन पक्ष फोडत आहेत.त्यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप व शिंदे गटाचे आमदार हे कामे न करताच पैसे गोळा करत आहेत. त्यांच्या काळात झालेल्या विहीरी, रस्ते व सभागृह हे गायब झाले आहे. याचा अर्थ त्यांनी काम न करताच बिले काढली आहेत.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय निकम यांचे भाषण झाले. सध्या कपडे बदलावे तसे लोक पक्ष बदलत आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे असे ते म्हणाले. आ. बोरणारे यांच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीका केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपतालुकाप्रमुख ॲड. रमेश सावंत व प्रभाकर बारसे यांनी केले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख ॲड.आसाराम रोठे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, संभाजीनगर शहरप्रमुख संतोष जेजूरकर, सुनिता आऊलवार, तालुका प्रमुख सचिन वाणी, तालुका संघटक मनाजी मिसाळ, नंदकिशोर जाधव, वर्षा जाधव, ऋषिकेश धाट, प्रशांत शिंदे, विठ्ठल डमाळे, लता पगारे, संजीवनी गोरक्ष, बाळु बारसे, राजू थोरात, अक्षय साठे, सुदाम खिल्लारी, लक्ष्मण खटाणे, भाऊसाहेब नागुडे, ॲड. एकनाथ कुंजीर, शिवाजी आधुडे, सखाहरी चंदने, नानासाहेब नागुडे आदींची यावेळी उपस्थिती होती.