औरंगाबाद जिल्हा दूध संघ निवडणूक ; वैजापूर मतदारसंघात डिके व जाधव यांच्यात लढत

वैजापूर ,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणूक रिंगणातून 53 उमेदवारांनी माघार घेतली आहे.संचालकांच्या 14 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 7 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.वैजापूर मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते तथा  संघाचे विद्यमान संचालक कचरू पाटील डिके व पालखेडचे माजी सरपंच तथा शिवसेना कार्यकर्ते नंदकिशोर जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे.या लढतीत कचरू पाटील डिके यांचे पारडे जड असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

जिल्हा दूध संघाच्या 14 जागांसाठी 22 जानेवारीला निवडणूक होणार असून यासाठी 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत 25 अर्ज अवैध तर 74 वैध ठरले.53 उमेदवारांनी माघार घेतली असून 15 उमेदवार निवडणुक आखाड्यात आहेत. दाखल अर्जांची संख्या व आलेले दिग्गजांचे उमेदवारी अर्ज पाहता निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते तर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहींचे प्रयत्न होते. परंतु विधान सभेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन हरिभाऊ बागडे, राजेंद्र पाथरीकर, पुंडलिक काजे, कचरू पाटील डिके, गोकूळसिंग राजपूत व शीला कोळगे या विद्यमान संचालकांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. जिल्हा दूध संघाच्या या निवडणुकीत वैजापूर मतदार संघात विद्यमान संचालक कचरू पाटील डिके व पालखेडचे माजी सरपंच नंदकिशोर जाधव यांच्यात  लढत होत आहे. वैजापूर तालुक्यात एकूण 32 मतदार असून त्यापैकी बहुतांश मतदार हे विद्यमान संचालक कचरू पाटील डिके यांच्या बाजूचे आहेत त्यामुळे श्री.डिके पाटील यांचे पारडे जड असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.