वैजापूर तालुक्यात सरासरीच्या 27 टक्केच पाऊस मोठ्या पावसाची गरज ; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केलेला असतानाच दुसरीकडे पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटूनही तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. या कालावधीत सरासरीच्या 27 टक्के पाऊस झाला. तालुक्यातील  बोरसर, खंडाळा व लासूरगाव या तीन महसूल मंडळातच  दमदार पाऊस झाला आहे. उर्वरित नऊ मंडळातील गावे अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यात आता मोठ्या पावसाची गरज असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहे. 

       यंदा तालुक्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरानेच सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर शेतीगाडा हाकण्यास बळीराजा कामाला  लागला अन् खरिप पेरण्यांना वेग आला. तालुक्यात अजूनही पूर्ण पेरण्या झाल्या नाहीत. याशिवाय तालुक्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्येही  वाढ झालेली नाही. यावर्षी उशिरा झालेल्या पावसाचा शेती उत्त्पन्नावर प्रभाव पडणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या परिस्थिती बिकट नसली  तरी आगामी काळात बळीराजा मोठया पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जेणेकरून पशुधनाच्या चाऱ्याची सोय होऊन  रब्बी पिकांसाठीचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 550 मि.मी. एवढे  असून पावसाळा सुरू होऊन पावणेदोन  महिन्याचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत तालुक्यात 146 मि.मी म्हणजेच  सरासरीच्या फक्त 27 टक्के एवढाच पाऊस झाला आहे. तीन महसूल मंडळांचा अपवाद वगळता अन्य  नऊ मंडळात अद्यापही मोठ्या पावसाची गरज आहे. 19 जुलैपर्यँत बोरसर मंडळात सर्वाधिक म्हणजे 224 मि.मी  तर बाबतारा महसूल मंडळात सर्वात कमी म्हणजे 63 मि.मी एवढा पाऊस झाला आहे.

वैजापूर तालुक्यातील 12 महसूल मंडळातील पावसाची आकडेवारी अशी –  

वैजापूर : 146 मि.मी, खंडाळा : 219, शिऊर : 147, बोरसर : 224, लोणी ( खुर्द ) :125 , गारज : 140, लासूरगाव : 194, महालगाव : 152, जानेफळ : 64 , बाबतारा : 63, नागमठाण : 162 व घायगाव : 116 मि.मी.