अर्थसंकल्पात वैजापूर-गंगापूर मतदार संघासाठी 165 कोटींची तरतूद -आमदार बोरणारे

वैजापूर-गंगापूर मतदार संघात गेल्या दोन वर्षात 322 कोटींचा विकास निधी आणला – आमदार बोरणारे

वैजापूर,१३ मार्च  /प्रतिनिधी :- राज्य शासनाकडून वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन वर्षांमध्ये 322 कोटींचा  विकास निधी मंजूर करून आणला असून या प्राप्त निधीमुळे मतदार संघातील वैजापूर शहरासह 218 गावात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु झाली आहे.अशी माहिती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ग्रामीण विकास,ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते, आरोग्य विभाग, जलसंधारण, महावितरण या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 28 महिन्याच्या कालावधीत टप्याटप्प्याने हा विकास निधी मंजूर झाला आहे. विधिमंडळ सभागृहातील सलग तीन वार्षिक अर्थ संकल्पात मतदारसंघासाठी एकूण 165 कोटीची आर्थिक तरतूद विकास कामासाठी पहिल्यांदाच मिळाली आहे. सत्ताधारी सरकार मधील आमदाराला मतदार संघातील विकास कामाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात आहे.

चालू वर्षातील अर्थ संकल्पात जिल्हा परिषदेचे अखत्यारीत गाव रस्ते, इतर जिल्हा मार्ग निर्मितीसाठी 37 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डोंगरीथडी, शिवनाथडी, गंगथडी या भागात रस्त्याची नवीन बांधणी करण्यात येईल.यात प्रामुख्याने लोणी खुर्द ते वाकला हा अनेक वर्षांपासून रस्ते विकासा पासून वंचित रस्त्याचे भाग्य उजळले आहे.शहराला पिण्याच्या पाणी व सिंचनासाठी लाभदायी नारंगी मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरुस्ती कामासाठी 38 कोटीचा निधी मंजूर झाला.सदगुरु गंगागिरी महाराज सराला बेट परिसर सुशोभीकरणासाठी  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाच कोटीचा विशेष निधी मंजूर केला.

वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे.मात्र याठिकाणी ” राजकारणापेक्षा शहर विकासाची भुमिका ” शिवसेनेने जपली आहे.माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या शिफारशीवरुन मुस्लिम बांधवांसाठी सुसज्ज शादीखाना, तीन स्वागत कमानी, बाजार पेठेतील तीन माॅडेल सिमेंट काँक्रीट रोड , आठ मोकळा परिसराचा (विकास ओपन पेस) जवळपास 15 कोटीचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर शहराला उपलब्ध करुन दिला आहे.मतदार संघात गंगापूर तालुक्यातील ५२ गावाचा समावेश आहे.या भागात ग्रामविकास विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते आदीसह विविध योजनेतील विकास कामे पूर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे आ.बोरनारे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, शहरप्रमुख राजेंद्र सांळुके, कल्याण जगताप, रणजीत चव्हाण, स्वीय सहाय्यक रामदास वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. 
केंद्रीय राज्य मंत्र्यांना चिमटा

वैजापूर तालुक्यातील माझे जन्मगाव सटाणा येथे केंद्रीय वित्त राज्य मंत्र्यांनी मागील महिन्यात दौरा करुन तिथे भाजपा शाखाचे नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते.सटाणा गावासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री विकास कामासाठी निधीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती.मात्र त्यांना कोणतीच घोषणा  केली नाही.त्यामुळे सटाणा गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी निधी मंजूर केल्याचे आ.बोरनारे यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले. 

राज्य सरकार पुरस्कृत कामाची यादी

वैजापूर विधानसभा मतदार संघासाठी 28 महिन्याच्या कालावधीत 322 कोटीचा मंजूर झालेला निधी हा राज्य सरकारने पुरस्कृत योजनेचा आहे.विरोधी पक्षातील चौकडी मंडळी केंद्राच्या निधीचे श्रेय येथील आमदार लाटतात असा जाहीर प्रचार करतात.त्यामुळे प्रसिद्धी माध्यमाकडे आम्ही केवळ राज्य सरकारने दिलेला निधीची अधिकृत यादी जाहीर केली आहे.यात केंद्र सरकारने निधी दिलेल्या कामाचा समावेश नसल्याचा खुलासा आ.बोरनारे यांनी बोलताना केला.