गांजा विक्री प्रकरणातील फरार आरोपीला श्रीरामपूर येथून अटक ; वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :-गांजा विक्री प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी श्रीरामपूर (जिल्हा अहमदनगर) येथे अटक केली.‌ रमजान उस्मान शेख (रा. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य आरोपी गणेश इंद्रराज गायकवाड (रा. वैजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याने श्रीरामपूर येथील रमजान उस्मान शेख यांच्याकडून गांजा विकत घेत असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून तो फरार होता. पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्या आदेशानुसार सोमवारी (ता.१७) वैजापूर हद्दीत कॉंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यामध्ये त्या आरोपीचा श्रीरामपूर येथे जाऊन शोध घेण्यात आला. त्यावेळी आरोपी रमजान शेख यास अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक काळे, गायकवाड, जोनवाल, मोरे यांनी ही कारवाई केली.