राष्ट्रवादी बंडखोरांचा गट पुन्हा शरद पवार भेटीला 

त्यामुळे आजही आशीर्वाद घेण्यासाठी आलो!-आजच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

मुंबई : कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी वायबी सेंटरला जाऊन शरद पवारांची भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, काल मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आज पुन्हा अजित पवारांसकट त्यांना पाठिंबा देणारे आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी सेंटरला गेले होते. एक तास चाललेल्या या भेटीमागचं कारण प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आज विधीमंडळाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदरणीय शरद पवारसाहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आम्ही वायबी सेंटरला आलो. माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी काल इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यामुळे बर्‍यापैकी आमदार मुंबईत हजर होते. त्यामुळे फक्त मंत्र्यांनाच नव्हे तर बाकीच्याही आमदारांना आदरणीय शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळवून देण्याच्या निमित्ताने आम्ही आलो.

पुढे ते म्हणाले, आज आम्ही माहिती काढली की पवार साहेब वायबी सेंटरला दुपारच्या वेळेत येणार आहेत आणि त्यानुसार आम्ही आलो आहोत. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल म्हटल्याप्रमाणे एकत्र येण्याची तशीच विनंती करुन आम्ही निघालो. पक्ष एकसंघ राहावा या दृष्टीने पवार साहेबांनी विचार करावा, अशी विनंती करुन आम्ही जात आहोत, असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं. आता यावर शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदार हे वायबी चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. त्यावेली झालेल्या शरद पवार यांच्याभेटीत सर्व आमदारांनी त्यांना पक्षात फुट पडू देऊ नये. असी विनंती केली. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितीत आमदारांना आपापल्या भागात पेरण्याच झाल्या आहेत का? याबाबत विचारणा केली.