शीतल म्हात्रेंचा तो मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना अटक

मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असं या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.

शनिवारी रात्री हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री उशिरा दहिसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारावर शीतल म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.”

शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरी देखील आम्ही उत्तर दिले नाही. मात्र ज्या पद्धतीने व्हिडीयो काढून त्यावर गाणे टाकून ते मातोश्री फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले. ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि फेसबुक पेजवर ते व्हायरल करण्यात आले.” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

“स्त्रिच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल, तर चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. यापूर्वीही घोसाळकरांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी मी तेव्हा ठाम राहिले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. मात्र या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला.आणि ते म्हणाले की, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे’ असा धीर दिला.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. फक्त मुंबई, पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडियो शेअर केला असे तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापणार आहे.

फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर यावर संताप व्यक्त करत शीतल म्हात्रे आणि सुर्वे समर्थकानी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.