मुख्यमंत्र्यांकडून आत्महत्या मुक्त राज्य करण्याच्या पोकळ घोषणा – माजी आमदार चिकटगावकर

वैजापूर तालुक्यातील वाकला येथे शेतकरी संवाद मेळावा

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्महत्या मुक्त राज्य करण्याच्या पोकळ घोषणा करत आहे. मात्र शासकीय पातळीवर आत्महत्या रोखण्यासाठी कोणतीच प्रभावी उपाययोजना तयार केली नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. वाकला ता. वैजापूर येथे शिवसेना शाखेकडून आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय निकम, विठ्ठल डमाळे, रिखबचंद पाटणी, मनोज सोनी, दत्तू त्रिभुवन, राजेंद्र मगर, उत्तम निकम, प्रशांत शिंदे अक्षय साठे यांची उपस्थिती होती. 

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, राज्यात  ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला मात्र प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे देखील अद्याप अनेक ठिकाणी झालेले नाहीत. काही शेतक-यांचे उभे शेत देखील वाहून गेल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. शेतीच्या नुकसानामुळे शेतकरी बांधव  आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. मात्र सरकारकडून कोणतीच मदत अद्याप मिळाली नसून सरकारच्या धोरणांवर  जनता प्रचंड नाराज असल्याचे दानवे म्हणाले.

चार महिन्यात अकराशे आत्महत्या

महाराष्ट्रात मागील चार महिन्यात जवळपास अकराशे  शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी मित्राने तर ऐन पंतप्रधानांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांना पत्र लिहून आत्महत्या केली. युवकांना मिळणारा रोजगार देखील गुजरातच्या घशात घातला जात आहे. या सरकारला शेतकरी कष्टकरी बांधवांची पर्वा नसल्याचे म्हणत कृषिप्रधान असलेल्या आपल्या राज्यात  सरकारकडून मोठमोठ्या मदतीची नुसती घोषणाबाजी होत असून वास्तविक काम मात्र शून्य आहे, यावर आवाज उठवणे आवश्यक आहे. सरकारला आलेल्या सत्तेची पैशांची मस्ती उतरवणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्कारात फार हुरळून जाण्यापेक्षा जनतेसाठी त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे अधिक महत्वाचे असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

सेनेचे 140 आमदार निवडण्याचा विक्रम करणार

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या ४० आमदारांच्या जागी 140 आमदार निवडून आणून नवीन इतिहास रचला जाईल. असा दावा दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.  त्याचबरोबर शेतकरी, नागरिकांच्या  विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असेल अशी ग्वाही देखील दानवे यांनी यावेळी दिली. शिवसेनेत प्रवेश केलेले  माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. आता यापुढे पक्ष बदलणार नाही तशी वेळ दानवे साहेब माझ्यावर येवूच देणार नाही. आणि जर तशी वेळ आलीच तर पक्ष बदलापेक्षा आत्महत्या करेन पण पक्षाशी प्रतारणा करणार नाही.