आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तालयावर मोर्चा

छत्रपती संभाजीनगर,१७ जुलै  / प्रतिनिधी :- सर्वसामान्य ठेवीदारांचे तब्बल २०० कोटी हून जास्त रुपयांचा महाघोटाळा करून कोट्यवधी रुपये बळकविणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व  संचालका विरोधात सोमवार  १७ जुलै रोजी  क्रांती चौक ते थेट पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

 आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पतसंस्थेत शहरासह तालुक्यातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे शेकडो रुपये अडकले आहेत.

https://fb.watch/lQ_hGZoEtT/

मागील दोन-तीन महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला मिळतील असे सांगून केवळ भूलथापा दिल्या गेल्या.

या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी घोटाळेबाज संचालकांना अटक करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंबंधीची घोषणाबाजी करण्यात आली.

आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एका ठेवीदाराने आत्महत्या केल्याची घटनाही नुकतीच घडली. यामुळे 62 हजारांहून अधिक गोरगरीब, मध्यम शेतकरी व कष्टकरी ठेवीदारांच्या ठेवी परत कशा मिळणार? याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्वांना न्याय मिळावा, दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी संघर्ष कृती समितीने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात क्रांती चौक ते पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला.

पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, हक्काचे पैसे त्वरीत परत मिळालेच पाहिजे. घोटाळेबाज संचालक, अधिकारी, कर्मचारी, सीए आणि आऑडिटर यांना अटक करावी व सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करा, घोटाळेबाजांना शिक्षा झालीच पाहिजे, अशा विविध मागण्यांचे पोस्टर्स या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. त्यांनी एका निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे या घोटाळ्याशी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.