अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री :सत्तारांच्या अपशब्दांवरून आदित्य ठाकरेंची टीका

गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? – आदित्य ठाकरेंचा सवाल!

सिल्लोड , ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवार) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेत राज्य सरकार आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली. “राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केले, सर्वत्र ओला दुष्काळाची मागणी होत असताना कृषिमंत्री ओला दुष्काळ नाहीच आहे असं म्हणत आहेत. या गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही आहे.” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.सिल्लोड मतदार संघातील लिहाखेडी गावात जाऊन आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कृषीमंत्र्यांचा मतदार संघ असूनही शेतकऱ्यांच्या बांधावर यायला देखील त्यांना वेळ नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे हे दुर्दैव आहे.

अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल घाणेरडे शब्द वापरले आहेत, अशी घाण केंद्रातल्या भाजप सरकारला हवी आहे का, असा सवाल सोमवारी युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलताना केला.

सत्तारांवर कारवाई होईल?

आदित्य ठाकरे म्हणाले, अब्दुल सत्तारांवर काही कारवाई होईल का? आज शेतकरी त्रस्त आहे पण ते गलिच्छ प्रकार करीत आहेत. मला नाव ठेवा पण महिलेंवर टीका करणे अयोग्य नाही.

“गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल.”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर देखील राज्य सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात येणारे रोजगार गुजरातमध्ये गेले. या गद्दारांची चांगली व्यवस्था केली म्हणून धन्यवाद देण्यासाठी या गद्दार सरकारने हे उद्योग गुजरातला दिले का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. “एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे. यांचं हिंदुत्व हे राक्षसी हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे रामाचं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असं हिंदुत्व आहे.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.