पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्या खबरदारी:महावितरणचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर,२५ जुलै  / प्रतिनिधी :-पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयाने केले आहे.

            मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या वीज वहन तारांवर अडकून पडल्या असल्यास त्या स्वत: काढण्याचा प्रयत्न करू नये. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला वा मोडला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्वरित महावितरणशी संपर्क साधावा.

झाड तोडताना त्याच्याजवळ अथवा सानिध्यात विद्युत तारा येत नाहीत ना याची खबरदारी घ्यावी. अशा तारा असतील तर त्यातील वीजप्रवाह महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून बंद करून, सुरक्षित करून मगच अशा फांद्या तोडाव्यात. ग्राहकांनी कोणत्याही विद्युत खांबांना, तारांना, वाहिन्यांना व अन्य उपकरणांना स्पर्श करू नये. तसेच विद्युत खांबांना व उपकरणांना जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) बसवावे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल. अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करा. गरजेनुसार त्याची तपासणी करावी. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: टिन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत वाहिनीवर आकडा टाकून विद्युतपुरवठा घेण्याचा प्रयत्न करू नये.

घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली असल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. घरामध्ये असलेली विद्युत यंत्रणा व घराजवळ असलेली अर्थिंग मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून तपासून घ्यावी. मीटर बोर्डापासून मोटारीपर्यंत जाणाऱ्या केबल्सना जोड देऊ नये.

 चालू स्थितीतील मोटार यंत्र उचलून दुसऱ्या जागी हलवू नये. अंगणात, परसदारी दिवा लावण्यासाठी फ्लेक्झिबल वायर पत्र्यावरून अथवा धातूच्या दारातून अँगलला गुंडाळून नेणे धोकादायक आहे. त्यामुळे सर्व धातूच्या वस्तू विद्युत प्रवाहित होऊ शकतात. घराचे बांधकाम विद्युत वाहिनीखाली अथवा सुरक्षित अंतरापेक्षा कमी अंतरावर करू नका. पोल अर्थिंगच्या वायर्स तोडू नका. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता आहे. उंच धातूच्या वस्तू नेताना मार्गातील विद्युत तारांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ट्रक अथवा उंच वाहनांच्या टपावर बसून प्रवास करू नये.

शेतातील पिकांचे वा फळबागेचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपणामध्ये वीजप्रवाह सोडू नये. अशा प्रकारे जीवित हानी होते. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि फिडर बंद करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी बंद होतो. त्यामुळे ग्राहकांच्या वीजपुरवठा बंद होण्याच्या तक्रारी वाढतात. अशा स्थितीत संभाव्य धोका/अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरू असलेल्या कॉल सेंटर्सचे 1912, 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. वीजसेवेच्या  तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती टोल फ्री क्रमांकांवर देण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.