महावितरणमध्ये गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर ,​१ मे ​/ प्रतिनिधी :- महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक व परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            यानिमित्त सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले व मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता संजय सरग, मोहन काळोगे, प्रभारी अधीक्षक अभियंता सतीश खाकसे, प्रभारी  महाव्यवस्थापक (‍वित्त व लेखा) लक्ष्मीकांत राजेल्ली, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)‍ शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

            याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले म्हणाले की, पुरस्कार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी यापुढेही अधिक चांगले काम करावे आणि इतरांनीही त्यापासून प्रेरणा घ्यावी. महावितरणचे सर्वच कर्मचारी उत्तम काम करत आहेत. मात्र काम करताना तांत्रिक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने विद्युत अपघातात मृत्यू होतो. यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. आगामी वर्षात कुणाचाही प्राणांतिक अपघात होणार नाही, असा संकल्प करूया. मुख्य अभियंता सचिन तालेवार म्हणाले की, महावितरण ही सार्वजनिक सेवा कंपनी आहे. जनतेची सेवा करणे हे आपले काम आहे.‍ ग्राहकांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसह अखंडित वीजपुरवठा देणे आणि खंडित वीजपुरवठा वेळेत पूर्ववत करणे हे काम अधिक ‍प्रभावीपणे करण्याचा संकल्प करूया.

अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी विद्युत अपघात टाळण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे तसेच सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले.‍ यावेळी मेडिकव्हर रुग्णालयाच्या वतीने सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आली. डॉ.राहुल रुईकर यांनी किडनीच्या आजारापासून दूर कसे राहावे याबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतुल देवकर, कामगार संघटनांचे पदाधिकारी अरुण पिवळ, श्रावण कोळनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, प्रवीण दांडगे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख लिपिक जयश्री कांबळे, फारूक शेख, सागर अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी पुढीलप्रमाणे : शहर मंडल – अभयकुमार महाजन, तुळशीदास बढे, रवींद्र दहीकर, रवी साळवे, रवींद्र दाभाडे, भागवत गव्हाणे, तुळशीराम सपकाळ, पंढरीनाथ शिंदे, गणेश पालोदकर, विलास कोरडे, लव चकाले. ग्रामीण मंडल – अर्जुन टेके, सुधीर गोरे, रघुनाथ जैवळ, अशोक तिखे, ईश्वर मुळे, योगेश जैस्वाल, योगेश मालोदे, विशाल भोकरे, राजेंद्र जगताप, सुधीर ‍शिंदे, वसंत अव्हाळे, विजय झोंड, सय्यद इम्रान, कृष्णा साळवे, राजेंद्र कोचे, ‍शिवप्रसाद लिंगायत, किरण ‍परिसकर. जालना मंडल – संजय मगरे, शरद धनवई, कृष्णा गावंडे, गजानन गिरी, परमेश्वर चव्हाण, सुनील बनकर, विनोद नामदे, गजानन गोधे, शिवाजी पठाडे, विलास खरात, ज्ञानेश्वर बोराडे, बालाजी खरात. विशेष गुणगौरव पुरस्कार : ज्ञानेश्वर आर्दड, रमेश  शिंदे, नवनाथ पवार. ‍बाह्यस्रोत कंत्राटी वाहनचालक सय्यद अल्ताफ यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.