छत्रपती संभाजीनगर परिमंडलात रोहित्र नादुरुस्तीच्या प्रमाणात लक्षणीय घट

छत्रपती संभाजीनगर,२५ जुलै  / प्रतिनिधी :-महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटवण्यात यश आले आहे. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या पुढाकारातून रोहित्रांचा प्रणालीत समावेश, वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम व नियमित देखभाल-दुरुस्ती या त्रिसूत्रीद्वारे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी झाले आहे.‍

रोहित्र हा विद्युत वितरण व्यवस्थेचा आत्मा असतो. उपकेंद्रातून निघणाऱ्या वाहिन्यांवरील उच्चदाब विजेचे आपल्या घरात वापरयोग्य लघुदाब विजेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे वितरण रोहित्र. सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी रोहित्र सुस्थितीत असणे आवश्यक असते. मात्र विविध कारणांनी ते काहीवेळा नादुरुस्त होते. शेतीपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर,‍ वीजवाहिन्यांवर आकडे, बिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही अनधिकृत वीजवापर, देखभाल व दुरुस्तीचा अभाव तसेच पावसाळ्यात वीज कोसळणे ही रोहित्र नादुरुस्त होण्याची प्रमुख कारणे आहेत.

मुख्य अभियंता डॉ. केळे यांनी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पदभार स्वीकारला. यानंतर घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी परिमंडलातील रोहित्र नादुरुस्तीची गांभीर्याने ‍दखल घेतली. थ्री फेज व सिंगल फेज रोहित्राच्या नादुरुस्तीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत क्षेत्रीय अभियंत्यांशी चर्चा केली असता लगतच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी नवीन रोहित्रे बसवलेली आहेत, परंतु त्यांची महावितरणच्या प्रणालीत (नेटवर्क डाटा मॅनेजमेंट) नोंद नसल्याचे आढळून आले. मुख्य अभियंता डॉ. केळे यांनी तीन दिवसांत नवीन रोहित्रांचा समावेश प्रणालीत करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 52 हजार 351 वितरण रोहित्रे होती. या मोहिमेनंतर जूनमध्ये नवीन 7800 रोहित्रांची प्रणालीत नोंद करताच ही संख्या 60 हजार 151 वर पोचली आहे.

पाच वर्षांपूर्वी डॉ.मुरहरी केळे हे अकोला येथे कमी कालावधीसाठी मुख्य अभियंतापदी असतानाही तेथे ३ ते साडेतीन हजार रोहित्रे प्रणालीत कमी असल्याचे त्यांना आढळले होते. अकोल्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच मोहीम राबवून रोहित्रे प्रणालीत समाविष्ट करण्यात आली. त्यावरून डॉ.केळे यांनी हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर परिमंडलातही राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरातही रोहित्रे प्रणालीत आणताच त्यांची संख्याही वाढली, परिणामी रोहित्र नादुरुस्तीचे पूर्वीच्या संख्येनुसार असलेले प्रमाणही आपोआप घटले.

वीजचोरीमुळे ‍वितरण रोहित्रावर अधिकचा भार येऊन ते नादुरुस्त होते. त्यामुळे परिमंडलात वीजचोरीविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश डॉ.केळे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महिन्यातील किमान तीन दिवस केवळ वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जूनमध्ये जवळपास 3319 जणांवर कारवाई करत 2 कोटींची वीजचोरी उघडकीस आणण्यात यश मिळाले. ‍नियमित कारवाईमुळे महावितरण्याच्या महसूलवाढीमुळे रोहित्रे सुस्थितीत राहण्यासही मदत होत आहे.

याबरोबरच रोहित्रांसह विद्युत वितरण यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकडे कटाक्षाने लक्ष देण्यास डॉ.केळे यांनी सूचित केले आहे. ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी प्रलंबित न ठेवता तातडीने विहीत कालावधीत तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.