देशपांडे हल्लाप्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात, केसचा तपास क्राईम ब्रांच करणार

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (४ मार्च) सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले. त्या दोन जणांपैकी अशोक खरात हा शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती हा त्याचाच सहकारी आहे. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत. यानंतर सायंकाळी आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास आता क्राईम ब्रांच करणार आहे.

हल्ला केल्याची आरोपींची कबुली

मॉर्निंग वॉक करताना संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या चौघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टिकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. यापैकी खरात विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तो शांत होता. खरातचे शिवसेना नेत्यांसोबतचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत.

संदीप देशपांडे यांच्या हातांना आणि पायांना गंभीर इजा झाली होती. स्थानिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याने मी घाबरलेलो नाही. हल्ल्यामागे कोण आहे हे प्रत्येकाला माहीत आहे, असे देशपांडे कोणाचेही नाव न घेता म्हणाले.

पक्षाचे नेते संतोष धुरी म्हणाले की, हल्ल्याचा हेतू स्पष्ट झालेला नसला तरी हल्ला ठरवून केलेला होता. हल्लेखोर चार असावेत. त्यांनी चेहरे झाकलेले होते व देशपांडे यांना दुखापत करण्यासाठी शस्रांसह तयारीने आले होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांचा मुलगा अमित ठाकरे व मनसेच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी रुग्णालयात आणि नंतर देशपांडे यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली.या हल्ल्यामागे राजकीय वैर असल्याचा आरोप भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी करून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत व इतरांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

पोलिस संरक्षण नाकारले

संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी देऊ केलेले संरक्षण नाकारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशपांडे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली व दोन पोलिस अंगरक्षक नेमले. शिंदे यांचे देशपांडे यांनी आभार मानले व मला संरक्षणाची गरज नाही, असे म्हटले. अशा हल्ल्यांनी मी वाकून जाणार नाही. माझ्यावरील हल्ल्यामागे कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. खरी गरज संरक्षणाची तर त्यांना आहे, असे देशपांडे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

त्यांनी घटनाक्रम सांगितला. शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक ५ जवळ चालत असताना एक अनोळखी व्यक्ती खूप जवळून माझा पाठलाग करीत असल्याचे मला लक्षात आले. लगेच त्या व्यक्तिने मागून माझ्यावर हल्ला केला. मी संरक्षणासाठी माझा उजवा हात वर केला. परंतु, त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याने माझ्या पायांवर हल्ला केला ते हल्ला करीतच राहिल्यामुळे मी खाली पडलो. तेथील लोकांनी आरडोओरड केला व ते माझ्याकडे धावले. हल्लेखोर पळून जाताना त्यांना दिसले. वारंवार विचारूनही देशपांडे यांनी हल्ल्यामागे असलेल्या व्यक्तिचे वा व्यक्तिंची नावे सांगण्यास नकार दिला.

 “मी पोलिसांना सगळे काही सांगितले आहे. क्रिकेट खेळण्यासाठी स्टम्प्ससह कोण आले होते व त्यांचा कोच कोण होता या गोष्टी येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले. संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेतील कोविड-१९ कंत्राटांच्या चौकशीची तक्रार केली होती. या तक्रारीचा या हल्ल्याशी संबंध कदाचित असू शकतो, असा त्यांना संशय आहे. पण त्यांनी त्याचा तपशील देण्यास नकार दिला.